कोरिया, वेल्स महिला संघ हैदराबादमध्ये दाखल
वृत्तसंस्था, / हैदराबाद
तेलंगणामध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 पात्रता स्पर्धेसाठी कोरिया आणि वेल्स महिला हॉकी संघ मंगळवारी हैदराबादमध्ये दाखल झाले.
8 ते 14 मार्च दरम्यान चालणाऱ्या या आठ देशांमधील स्पर्धेत बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून तीन संघ निश्चित होतील, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कप्तान ली युरीच्या नेतृत्वाखाली कोरिया मागील 9 विश्वचषक मोहिमांचा अनुभव घेवून आला आहे. जागतिक स्तरावर परतण्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीला आव्हान देण्याचा प्रयत्न ते करतील. (कांस्यपदक 1990). दरम्यान, 2025 युरो हॉकी चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद मिळवून वेल्स संघ येथे दाखल झाला आहे. 1983 नंतर त्यांच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत आपला ठसा उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
कोरिया, इंग्लंड, इटली आणि ऑस्ट्रिया संघ गट अ मध्ये तर वेल्स, भारत, स्कॉटलंड आणि उरुग्वे संघ गट ब मध्ये आहेत. तत्पूर्वी, उरुग्वे महिला राष्ट्रीय हॉकी संघ गेल्या आठवड्यात गुरूवारी हैदराबादला पोहोचला. इतिहासाच्या उंबरठ्यावर उभा असलेला उरुग्वे आपल्या पहिल्या महिला विश्वचषकात सहभागी होत आहे. कर्णधार बेलेन बॅरेरोच्या नेतृत्वाखाली, संघ प्रचंड प्रेरणा आणि दिवसेंदिवस दृढ मानसिकतेने या स्पर्धेसाठी दाखल झाला आहे. उरुग्वे संघाने पहिल्या एफआयएच हॉकी नेशन्स कप दोनमध्ये उपविजेतेपद आणि त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर पॅन अमेरिकन कप 2025 मध्ये ऐतिहासिक पदक मिळविले आहे.
विश्वचषकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, उरुग्वेला अत्यंत कठीण आव्हानातून मार्गक्रमण करावे लागले. ते 8 मार्च रोजी यजमान भारताविरुद्ध एका ब्लॉकबस्टर सामन्याने त्यांच्या मोहीमेची सुरूवात करतील. त्यानंतर 9 मार्च रोजी वेल्सविरुद्ध सामना करतील आणि 11 मार्च रोजी स्कॉटलंडविरुद्ध त्यांचा पूल टप्पा संपेल. क्वालिफायरमध्ये पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळवणारे संघ 15-30 ऑगस्ट रोजी बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील.