Konkan Tourist : भारत-पाक युद्धामुळे पर्यटकांची पाठ, पर्यटकांकडून कोकण बुकिंग रद्द
ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम सुरू होऊन तो मेपर्यंत चालतो
दापोली : भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये चाललेल्या युद्धाचा कोकणातील पर्यटनावर परिणाम जाणवला. शिवाय समुद्रकिनाऱ्यांवर हायअलर्ट जारी करण्यात आल्यामुळे अनेक पर्यटकांनी हॉटेलचे बुकींग रद्द केल्याचे समोर आले आहे. दापोली तालुक्यात पर्यटनाचा हा पावसाळ्या आधीचा शेवटचा हंगाम आहे. त्यानंतर जूनपासून पर्यटन बंद असते.
ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम सुरू होऊन तो मेपर्यंत चालतो. परंतु मे महिन्याचे जवळपास 15 दिवस कमी पर्यटन संख्येवर गेले. या कमी पर्यटकांच्या संख्येमुळे अनेक हॉटेल व्यावसायिक गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पर्यटक येतील अशा आशेवर आहेत.
युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक पर्यटकांनी पाठ फिरवली. शिवाय अनेकांनी हॉटेलला केलेले बुकींग देखील रद्द केल्याचे हॉटेल व्यावसायिक नरेश पेडणेकर, विराज खोत यांनी सांगितले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय आहे. एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे एकंदरीत असह्या उकाड्यामुळे पर्यटक वातानुकूलित असलेल्या खोल्या घेत असल्याने वातानुकूलित नसलेल्या खोल्या रिकाम्या राहात आहेत.
त्यामुळे घरगुती व वातानुकूलित नसलेल्या खोल्यांचे हॉटेल, लॉजचा या वर्षीच्या हंगामाचा आलेख उतरता ठरला आहे. मात्र उर्वरित मे महिन्याच्या 15 दिवसात पर्यटकांच्या गाड्या दापोली पर्यटनाकडे वळतील का? असा प्रश्न अनेक हॉटेल व्यावसायिकांना सतावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पर्यटक येण्याची शक्यता
शनिवारी सायंकाळी दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला आहे. तशी अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे. तसेच प्रसारमाध्यमातून येणाऱ्या खोट्या बातम्या आता बंद होणार असल्याने पर्यटकांची पावले पुन्हा कोकणाकडे वळतील अशी अपेक्षा येथील हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत.