कोकणचे पर्यटन बहरलेय, पण सुविधांचे काय?
ख्रिसमसचा सण, लागोपाठ सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटकांनी कोकण किनारपट्टीला पसंती दिली आहे. कोकणातील सर्व किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कोकणचे हे पर्यटन बहरत असतानाच पर्यटनस्थळांकडे जाणारे दर्जेदार रस्ते, वेगवेगळ्dया प्रकारच्या सुविधा आणि सुरक्षिततेचा प्रश्न मात्र पर्यटकांना सतावत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा कधी निर्माण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ख्रिसमसचा सण आणि वर्षअखेर आले की, या दिवसात सुट्ट्या घेऊन आनंद लुटण्यासाठी पर्यटक पहिली पसंती देतात ती गोव्यासाठीच! कोकणामध्ये स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे असूनही पूर्वी पर्यटकांचा थेट गोव्याकडे जाण्याचाच ओढा कायम असायचा. मात्र, अलीकडील पाच-सहा वर्षात हे चित्र बदलू लागले आहे. गोव्यातील गजबजाटापेक्षा शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे असलेल्या कोकणासही पर्यटक पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोकणातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
दिवाळीतील सुट्टी, उन्हाळी सुट्टी असो किंवा वर्षअखेर असो, सलग सुट्ट्या आल्या की पर्यटक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत असतात. वेगवेगळ्dया पर्यटनस्थळांना भेटी देणारे पर्यटक आता कोकणाकडे वळू लागले आहेत. अलिबागपासून ते शिरोडा-वेळागरपर्यंतच्या कोकण किनारपट्टीवरील सर्वच किनाऱ्यांवर पर्यटक गर्दी करु लागले आहेत. कोकणातील जगप्रसिद्ध मालवण-तारकर्ली आणि रत्नागिरी-गणपतीपुळे किनाऱ्यावर पर्यटकांची सर्वाधिक पसंती असली, तरी गुहागर, दापोली, आरेवारे, विजयदुर्ग, देवगड पवनचक्की, कुणकेश्वर, तोंडवळी, देवबाग, भोगवे, वेंगुर्ले सागरेश्वर, शिरोडा वेळागर, आचरा या सुमद्रकिनाऱ्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले आहेत.
निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, साहसी जलक्रीडा, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि चवदार खाद्यसंस्कृती यांचे अनोखे मिश्रण असलेले कोकणचे पर्यटन आता गोव्याला सक्षम पर्याय म्हणून उदयास आले आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी सुरु झालेल्या सुट्ट्यांमुळे हा पर्यटन उत्साह पुढील काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. पर्यटन म्हणजे केवळ समुद्रकिनारेच नव्हेत, तर इतिहास आणि श्रद्धेचे दर्शनही कोकणचे पर्यटन घडवून देते. सध्या सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीचे प्रतिक असलेल्या या किल्ल्याची बोटसफर पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा पर्यटकांच्या डोळ्dयाचे पारणे फेडत आहे. कुणकेश्वर मंदिर, गणपतीपुळेचे गणपती मंदिर अशा धार्मिक पर्यटनासाठीही पर्यटकांची लक्षणीय उपस्थिती दिसत आहे.
कोकणातील वाढत्या पर्यटनामुळे कोकणच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळत आहे. कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. त्यामुळे याठिकाणी मोठे उद्योग नाहीत. कोकणातील लोकांचे अर्थकारण हे मासेमारी, आंबा, काजू फळउत्पादनातून होत असते. मात्र, पर्यटन हे क्षेत्रसुद्धा आता अर्थकारण बदलणारे ठरत आहे. पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय, वाहतूक, बोट व्यावसायिक, जलक्रीडा केंद्रे, गाइड, स्थानिक विक्रेते यांना मोठे आर्थिक चलन मिळत आहे. यावर्षीचा ख्रिसमस ते नववर्षापर्यंतचा कालावधी हा मागील काही वर्षाच्या तुलनेत अधिक चांगला ठरला आहे. विक्रमी संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत.
पर्यटन व्यवसाय हा कोकणच्या अर्थकारणाला मोठी चालना देणारा आहे आणि दरडोई उत्पन्न वाढविणारा आहे. परंतु, सध्या पर्यटनासाठी सक्षम पर्याय म्हणून कोकणाला पसंती देणाऱ्या पर्यटकांना जर चांगल्या सुविधा मिळाल्या नाहीत, तर हेच पर्यटक कोकणाकडे कधी पाट फिरवतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाकडून जलक्रीडा केंद्रावर सुरक्षेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक, लाईफ जॅकेटस्, पर्यटकांसाठी सूचना फलक लावायला हवेत. त्याचबरोबर प्लास्टीकमुक्त किनारे, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी प्राधान्य द्यायला हवे.
कोकणात येणारे पर्यटक हे केवळ राज्यभरातूनच नाहीत, तर देशभरातून येऊ लागले आहेत. आगामी काळात विदेशी पर्यटकही येतील. पर्यटकांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन तेवढ्या दर्जेदार सुविधा देणे आवश्यक आहे. विदेशी पर्यटक आल्यास कोकणाला मोठे चलन मिळू शकते. आर्थिक उत्पन्नात भर पडू शकते. शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ ग्रुपचे पंचतारांकित हॉटेल होऊ घातले आहे. अशा प्रकारची चांगली हॉटेल्स झाली, तर देश-विदेशातील पर्यटक कोकणाकडे वळू शकतील.
कोकणातील सर्वच समुद्रकिनारे स्वच्छ-सुंदर आहेत. त्यात काही शंका नाही. परंतु, या समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे रस्ते मात्र अजूनही दर्जेदार होऊ शकलेले नाहीत. असलेला सागरी महामार्ग अजून चांगला मोठा बनविणे आवश्यक आहे. सागरी महामार्गाला जोडून किनाऱ्याकडे जाणारे रस्ते अगदी चिंचोळे आहेत. मालवण-तारकर्लीसारख्या किंवा गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखेंच्या पटीत असते. मात्र, त्या पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते मात्र अरुंद आहेत. ते रुंद केलेले नाहीत किंवा पर्यायी मार्गसुद्धा काढलेले नाहीत.
मालवणसारख्या शहरातून समुद्रकिनाऱ्यांवर जाताना वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न असतो. तासन्तास वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करणे, रिंगरोड करुन शहराबाहेरुन रोड काढणे आवश्यक आहे. तरच, पर्यटकांना मोकळेपणाने पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो पर्यटक येऊ लागले आहेत. मालवण, तारकर्ली येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक आवर्जुन सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी हमखास जातात. परंतु याठिकाणीसुद्धा पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चांगला मार्ग नाही. शाळेच्या सहली आल्यास तेथे एस.टी. बस जाऊ शकत नाही, एवढे अरुंद रस्ते आहेत. या सर्व असुविधांचा विचार करुन पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते सुसज्ज आणि दर्जेदार होणे आवश्यक आहे.
समुद्रामध्ये पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना ‘लाईफ जॅकेट’ घालणे सक्तीचे केलेले आहेच, पण समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक तैनात ठेवणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वीच गुहागर येथे समुद्रात बुडणाऱ्या तीनपैकी दोन पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षकांमुळेच यश आले. बुडणाऱ्या पर्यटकांना पाहून जीवरक्षकांनी तेथे तात्काळ पोहचून त्यांचा जीव वाचविला. दुर्देवाने एकाला वाचविता आले नाही. अशा प्रकारच्या घटना याहीपूर्वी अनेकवेळा घडून पर्यटकांचे जीव गेले आहेत. अतिउत्साही पर्यटक किंवा समुद्राच्या भोवऱ्याचा अंदाज नसणारे पर्यटक यात फसतात व बुडतात. त्यामुळे अशा पर्यटकांना वाचविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक नेमणे आवश्यक आहे.
दर्जेदार रस्ते, जीवरक्षक नेमणे या सुरक्षिततेबरोबरच समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतागृहे उभारणे, चेंजिंग रुम उभारणे, वाहतुकीची साधने निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्या गेल्या आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास कोकणातील पर्यटन व्यवसायाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. या एका पर्यटन व्यवसायातून कोकणचे अर्थकारण बदलू शकते आणि दरडोई उत्पन्नात अव्वल स्थान निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
संदीप गावडे