For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan Tourism : दापोलीत पर्यटन क्षेत्र टाकतेय कात, पर्यटकांची खास पसंती

11:18 AM Apr 21, 2025 IST | Snehal Patil
konkan tourism   दापोलीत पर्यटन क्षेत्र टाकतेय कात  पर्यटकांची खास पसंती
Advertisement

नारळ सुपारीच्या बागा, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्टस्, डॉल्फिन सफर यामुळे पर्यटनक्षेत्र कात टाकत आहे

Advertisement

By : प्रतीक तुपे

दापोली : पर्यटनाच्या नकाशावर दापोली तालुक्याने आपले नाव याआधीच ठळक केले असताना कर्दे, मुरूड, लाडघर, पाळंदे, आंजर्ले, केळशीमुळे दापोली जगाच्या नकाशावर अधिकच प्रकाशमान होत आहे. मासळीसाठी हर्णैला पर्यटक अधिक भेट देतातच. त्यात आता कोळथरे, दाभोळ, बुरोंडी गावांची भर पडत आहे. नारळ सुपारीच्या बागा, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्टस्, डॉल्फिन सफर यामुळे येथील पर्यटनक्षेत्र खऱ्या अर्थाने कात टाकत आहे.

Advertisement

दापोली पर्यटकांना पूर्वीपासून आकर्षित करत आहे. आता नव्याने मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे पर्यटक वाढत असल्याचे हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांशी संवाद साधताना स्पष्ट झाले. मिनी महाबळेश्वरला पाच वर्षात लाखो पर्यटकांनी भेट दिली. मात्र 2020 2021मध्ये कोरोनाचा फटका बसल्यामुळे पर्यटकांचा आकडा कमी झाला असला तरी 2022 पासून पर्यटकांच्या आकडेवारीत 5 ते 10 टक्क्यांनी प्रगती असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2020-21 कालखंडात ‘कोरोनाची’ समस्या नसती तर पाच वर्षात करोंडोचा आकडा पार झाला असता असा अंदाज देखील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला.

सुविधा आवश्यक

समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक गाड्या घेऊन जात असल्याने अनेक समस्या व धोका निर्माण होत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पार्किंगची आवश्यकता असून ती पाच वर्षात अद्याप अनेक झालेली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पर्यटक आपल्या गाड्या समुद्राच्या पुळणीत घेऊन जात आहेत. समुद्राला भरती आल्यानंतर गाड्या समुद्राच्या प्रवाहात वाहून जाऊन नुकसान होण्याचे अनेक प्रकार यामुळे पुढे येत आहेत.

मुरुड, कर्देकडे जाणारा मार्ग सुस्थितीत

मुरुड, कर्दे ही दोन गावे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे पर्यटक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. अनेक वर्षे रखडलेला हा रस्ता आता काँक्रिटीकरणानंतर सुस्थितीत झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी उपोषणेदेखील ग्रामस्थांनी केली होती. परंतु आता या रस्त्यावरील प्रवास सुकर झाला आहे. यामुळे पर्यटकांमध्ये समाधान आहे.

फोनच्या रेंजसाठी टॉवर आवश्यक

तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांच्या फोनना रेंज मिळत नसल्याने ते नेहमीच नाराजी व्यक्त करतात. यामुळे त्यांना संपर्क साधताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी बीएसएनएल कंपनीची तर काही ठिकाणी व्होडाफोनची रेंज मिळते. परंतु पर्यटकांकडे इतर कंपन्यांचीही सीम असल्याने त्यांना अनेक ठिकाणी रेंज मिळत नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून असणारी समस्या अद्याप सुटलेली नसल्याचे बोलले जात आहे.

कर्देला ‘बेस्ट टुरिझम’चा फायदा

दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात कर्देला पर्यटकांची पूर्वीपासून असणारी पसंती व आता गावात वाढलेले हॉटेल व्यवसाय यामुळे पर्यटकांची पसंती अधिक दिसत आहे. त्यातच मागील वर्षी कर्देला मिळालेल्या बेस्ट टुरिझम पुरस्कारामुळे अधिक परिणाम दिसून येतो. शिवाय पर्यटनाच्या विकासात्मक कामांसाठी गावाला 14 कोटी मंजूर झाले आहे. सध्या लाडघर, कर्दे पर्यटनक्षेत्राकडे अधिक पर्यटक वळत असल्याचे दिसून येत आहे.

एसी रुमची वाढती मागणी

उष्णतेच्या कालावधीत येणारा पर्यटक हा एसी खोल्यांची मागणी करत आहे. वाढती उष्णता हैराण करत आहे. त्यात ग्रामीण भागांमध्ये वारंवार जाणारी वीज, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा, यामुळे बंद पडणारे पंखे बंद आदी कारणांनी पर्यटक हैराण होत आहेत. त्यामुळे प्रथम पर्यटक एसी रुमला प्राधान्य देतात. परंतु मे महिन्यात एसी रुम फुल्ल झाल्यानंतर इतर हॉटेल व्यावसायिकांचा आसरा घेतात. शिवाय स्विमिंग पूलची मागणी होत आहे. मात्र नेमक्याच हॉटेलमध्ये स्विमिंग पूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरवर्षी 10 टक्के होतेय हॉटेल रुमची वाढ

दापोली तालुक्यात दरवर्षी 10 टक्के हॉटेल, रिसॉर्टच्या रुममध्ये वाढ होत आहेत. तर काही ठिकाणी स्पेशल हॉटेल, रिसॉर्ट देखील आकार घेत आहेत. यामुळे दरवर्षी पर्यटनक्षेत्रात हॉटेल, रिसॉर्ट, रुमची वाढ होताना दिसून येत आहे.

सुरक्षिततेचे काय?

समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षण ठरणारे वॉटरस्पोर्टस् आहेत. परंतु ज्यावेळी समुद्रात पर्यटक पोहत असताना बुडण्याचे संकट येते, अशा वेळी त्यांना वाचवण्यासाठी या स्पोर्टस्चा फायदा होतो. परंतु काही दिवसांपूर्वी डॉल्फिन सफरीसाठी असणारी बोट उलटली. त्यामुळे या वॉटरस्पोर्ट्स धारकांना प्रशिक्षण देण्याची गरज असून प्रशिक्षण असणाऱ्यांनाच परवानगी देण्याची गरज असल्याचे पर्यटन अभ्यासकांतून बोलले जात आहे.

पर्यटकांच्या आकडेवारीत दरवर्षी होतेय वाढ

"दापोलीतील जैवविविधता ही दापोलीची श्रीमंती आहे आणि ही पाहण्यासाठी पर्यटक येत असताना. शिवाय डॉल्फिन सफर, वॉटर स्पोर्टस्, स्वच्छ सुरक्षित समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 2022 पासून पर्यटकांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. शिवाय आता विविध योजनांच्या माध्यमातून पुढील हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायाच्या दृष्टीने आपण दापोली पर्यटनाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहोत."

- सचिन तोडणकर, हॉटेल व्यावसायिक कर्दे

अजूनही भौतिक सुविधांचा अभाव

"दापोली पर्यटनक्षेत्रांमध्ये अजूनही भौतिक सुविधांच वानवा आहे. अरुंद रस्ते, वीज अशा अनेक अजूनही थोड्या फार समस्या हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांना उद्भवत आहेत. त्या सोडवणे आवश्यक आहेत. पर्यटनासाठी शासनाने चांगल्या योजना राबवणे आवश्यक आहे. आता जसे कर्देला 14 कोटींच्या योजनेचा लाभ मिळाला, अशा योजना मोठ्या प्रमाणत राबवाव्या. याचा पर्यटनक्षेत्रांना लाभ होईल. एकंदरीत पर्यटक धोरण जाहीर करावे."

- विराज खोत,युवा हॉटेल व्यावसायिक, मुरुड

पर्यटक संख्या समाधानकारक

"दापोलीतील पर्यटनेत्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट होती. यामुळे पर्यटक नाराज होते. मात्र ही समस्या बऱ्यापैकी संपण्याच्या मार्गावर आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे ही समस्या मिटत असून रस्ते चांगलो होत आहेत. त्यामुळे पर्यटव संख्या देखील चांगली आहे."

- नरेश पेडणेकर, हॉटेल व्यावसायिक, लाडघर

विकासकांची जाहिरातबाजी पथ्थावर

कोकणातील अनेक जागा-जमिनी विकासकांनी घेतल्या आहेत. यामुळे बंगले व इतर सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळे हे विकासक वेळोवेळी दापोलीची विविध माध्यमातून जाहिरात करत असल्याने पर्यटनक्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत आहे.

90 टक्के पर्यटकांच्या जेवणात मासे

कोकणात येणारा 90 टक्के पर्यटक हा जेवणात मासे मागतो किंवा पर्यटक हर्णै बंदरात जाऊन मासे आणून बनवून घेतात. सुरमई, पापलेट, कोळंबी हे मासे पर्यटक अधिक प्रमाणात आणतात. उर्वरित 10 टक्के पर्यटक शाकारी जेवण पसंत करत असल्याचे हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनी स्पष्ट केले.प्रशिक्षण असणाऱ्यांनाच परवानगी देण्याची गरज असल्याचे पर्यटन अभ्यासकांमधून बोलले जात आहे.

Advertisement
Tags :

.