For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

डेटा सेंटरसाठी सह्याद्रीचा बळी? 23 पंप्ड स्टोरेज प्रकल्पांवरून डॉ. जयेंद्र परुळेकर आक्रमक

02:19 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
डेटा सेंटरसाठी सह्याद्रीचा बळी  23 पंप्ड स्टोरेज प्रकल्पांवरून डॉ  जयेंद्र परुळेकर आक्रमक
Advertisement
सावंतवाडी : डेटा सेंटरसाठी लागणारी वीज आणि पाण्याची गरज भागविण्याच्या नावाखाली पश्चिम घाटात 23 पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. या प्रकल्पांमुळे सह्याद्रीच्या पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होणार असून, महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
भीमाशंकर, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रस्तावित पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील आंजिवडे येथे अदानी समूहाचा वीज आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शेकडो वर्षांची नैसर्गिक संपत्ती कोणाच्या फायद्यासाठी नष्ट केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रकल्पांचे संकट

पश्चिम घाटाला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याच्या प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 गावांचा समावेश असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. त्यात दोडामार्ग तालुक्यातील 12 आणि सावंतवाडी तालुक्यातील 52 गावांचा समावेश आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायचे, हा शासनाचा दुटप्पीपणा असल्याची टीका त्यांनी केली.

Advertisement

आंजिवडे परिसरातील प्रस्तावित प्रकल्पामुळे 100 ते 150 वर्षे जुनी दुर्मिळ झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूच्या अधिवासालाही धोका निर्माण होऊ शकतो. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या परिसरात अशा प्रकल्पांची अंमलबजावणी करणे निसर्गासाठी घातक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

पाणीटंचाई आणि विकासकामांवर प्रश्नचिन्ह

मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे तापमानवाढीचे संकट गंभीर होत असल्याचे सांगत परुळेकर यांनी सिंधुदुर्गातील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त केली. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होणे ही गंभीर बाब असून, त्यासाठी मानवी हस्तक्षेपही कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळ्यात जलसंधारणाची कामे करण्याऐवजी केवळ दिखाऊ कामांवर भर दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

Advertisement

पिंगुळीतील पाझर तलाव आणि पाण्याच्या पाइपलाइनचे नुकसान करणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी. पिंगुळी, सासोली आणि पाट्ये परिसरातील कथित अतिक्रमणांबाबत चौकशी करून स्थानिकांचा पाण्याचा हक्क सुरक्षित ठेवावा. तसेच बांदा आणि सासोली परिसरातील विकासकामांचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.

पर्यावरणपूरक विकासाची भूमिका

“आम्ही विकासाच्या विरोधात नाही; मात्र पाणी आणि पर्यावरणाचा विनाश करणारा विकास नको,” अशी भूमिका परुळेकर यांनी स्पष्ट केली. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारे शाश्वत हरित प्रकल्पच सिंधुदुर्गात राबवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पिंगुळी आणि सासोली परिसरातील पर्यावरणीय प्रश्न, कथित बेकायदेशीर जमीन व्यवहार आणि स्थानिकांवरील अन्यायाची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल जयंत पाटील यांचे परुळेकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.