konkan Rain Update: किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस, कोकणातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका कायम आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी व रायगड जिह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह उर्वरित कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
गेल्या 4 दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोकणात विशेषत: तळकोकणात गेले दोन दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
कोकण किनारपट्टीजवळ असलेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या 6 तासात ताशी 5 कि.मी. वेगाने पूर्वेकडे सरकले आहे. शनिवार 24 मे रोजी दुपारी 11.30 वाजता ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ, अक्षांश 17.00 उत्तर आणि रेखांश 73.30 पूर्व, रत्नागिरीच्या जवळ केंद्रीत झाले होते. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकेल असा अंदाज असून कोकण किनारपट्टीला त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट
चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. ताशी 60 कि.मी. वेगाने वारे वाहतील. तसेच काही भागात अतिवृष्टीची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व रायगड जिह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह उर्वरित कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू झाल्या आहेत.
जिह्यातील शनिवारी सकाळपर्यंतचे पर्जन्यमान: मंडणगड-01.00 मि.मी., खेड-17.85 मि.मी., दापोली-7.14 मि.मी., चिपळूण -46.33 मि.मी., गुहागर-21.40 मि.मी., संगमेश्वर 71.08 मि.मी., रत्नागिरी -59.88 मि.मी., लांजा - 82.40 मि.मी., राजापूर 49.25 मि. मी.