Konkan Rain Update: ढगफुटीसदृश पावसाने कोकणाला झोडपले, साकव, मोऱ्या गेल्या वाहून
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले.
राजापूर : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका राजापूर तालुक्याला बसून पश्चिम किनारपट्टीच्या भागात घरांमध्ये पाणी भरल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी रस्ते, साकव, मोऱ्या वाहून गेल्या असून दरडी कोसळण्याचेही प्रकार घडले.
आडिवरेतील महाकाली मंदिराच्या परिसरातही पुराचे पाणी शिरले होते. तर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांचे पाणीही जवाहर चौकातील टपऱ्यांपर्यंत आल्याने व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. रत्नागिरी तालुक्यातील पावस बाजारपेठेतही पावसाचे पाणी भरल्याने दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले. तर गोळप-मानेवाडीत दरड कोसळल्याने 5 दुचाकी दरडीखाली गाडल्या गेल्या.
तसेच शुक्रवारी मध्यरात्री महामार्गावर कशेळी पुलानजीक रस्त्यावर पाणी आल्याने कार व टेम्पो ओढ्यात जाऊन अडकले. यानंतर रस्त्यावर पाणी वाढल्याने महामार्ग जवळपास 4 तास बंद होता. राजापूर तालुक्यात शुक्रवारी रात्री ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. मुसळधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्यात वाढ होवून मध्यरात्री पुराचे पाणी जवाहर चौकातील टपऱ्यांपर्यंत आले होते.
त्यामुळे शहरातील व्यापारीवर्गाची धावपळ उडाली. पुराचे पाणी शहरात शिरण्याच्या शक्यतेने बाजारपेठेतील व्यापारी सतर्क झाले होते. शहराकडून राजापूर रोड रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरही पाणी भरल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने या मार्गावरून प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
महाकाली मंदिर परिसर जलमय.. घरे, दुकाने पाण्याखाली..
या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्याच्या पश्चिम भागाला बसला. मुसळधार पावसामुळे आडिवरेतील ओझर नदीला महापूर आला असून पुराचे पाणी प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, तब्बल 37 वर्षांनंतर एवढ्या प्रमाणात महापूर आल्याचे पहायला मिळाले. रस्त्यालगतच्या अनेक घरांमध्ये 6 ते 7 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे स्थानिकांना मोठ्या आर्थिक हानीला सामोरे जावे लागले. रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानांनाही याचा फटका बसला.
4 ते 5 रस्त्यालगतचे स्टॉल वाहून गेले. महसूल गाव वाडापेठ व ऊंढे परिसरालाही पावसाचा मोठा फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे रस्त्यालगतच्या दुकानांसह घरातील साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबांनी आपली राहती घरे सोडून सुरक्षितस्थळी आसरा घेतला होता.
कोतापूर गावातही मोठे नुकसान
कोतापूर गावातही मुसळधार पावसामुळे रस्ते, घरे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कोतापूर वड ते एकवीरा देवी मंदिर या मार्गावरील नुकत्याच झालेल्या डांबरी रस्त्याचे डांबर उखडले गेले असून ठिकठिकाणी खड्डे पडले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
तसेच येथील रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये वहाळावरील मोरीचे पाणी शिरल्याने आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. कोतापूर लक्ष्मी केशव मंदिरालगत शाळेकडे जाणारा पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला. तसेच, ओंकार प्रभुघाटे यांच्या आगराचा संपूर्ण गडगा पुराच्या पाण्याने वाहून गेला. ज्यामुळे शेती व परिसरातील जमिनींचेही नुकसान झाले.
गंगाराम जाधव यांच्या काजू फॅक्टरीजवळील विहिरीसमोरील कुंपणाची रांगही कोसळली आहे. देवाचे गोठणेतील घरांमध्ये पाणी शिरले, बैलही गेला वाहून देवाचे गोठणे गावातील कातळीवाडीमधील पोलीस पाटील सुधीर शिरसाट यांच्या घरात वहाळाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. तर घराची भिंतही कोसळली.
रमेश नारकर यांच्या दुकानातील साहित्य, फ्रिज तसेच घरातील सामानाचे नुकसान झाले असून पाण्याची टाकी वाहून गेली. चारूदत्त करंगुटकर यांच्याही घरात पाणी शिरून नुकसान झाले. तसेच देवाचे गोठणे ग्रामपंचायतीकडून कातळीवाडीकडे जाणारा साकव वाहून गेला आहे. तर देऊळवाडी येथील विनायक दिक्षीत यांच्या लाकडाचे गोडावूनमधील साहित्य वाहून गेले.
तसेच एका शेतकऱ्याचा बैलही पुराच्या पाण्यात वाहून गेला. सोलगाव-देवाचे गोठणे मुख्य रस्त्यावरील मोरी वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. भंडारवाडीतील संरक्षक भिंत कोसळली असून तळेवठार येथील चव्हाण यांच्या घरालगत दरड कोसळली.
तालुक्याच्या अन्य भागातही मोठे नुकसान
भालावली, नाटे बांधकरवाडी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसानीचा सामना करावा लागला. भालावलीमधील मिलिंद आडविरकर यांच्या घरात पाणी शिरल्याने संपूर्ण कुटुंबाला सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा लागला. तर अन्य काही घरांमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले.
भालावली पुलावर पुराचे पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. राजवाडी वाडा भराडे, भालावली मिरवणेवाडी, मोगरे सडेवाडीतील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. धाऊलवल्ली भाटलेवाडीमधील साकव पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर येथील नवलादेवी मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. वाडा तिवरे येथील मधुकर गावकर यांच्या घराजवळील दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींसह रस्ते वाहून गेले आहेत तर अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले. तर अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावातील वाहतूक बंद आहे.
तालुक्यात झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कोकणपट्टीत मान्सूनने प्रवेश केल्यानंतर काही काळासाठी जोर ओसरलेला होता, त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. या काळात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात 3 दिवसांपासून जोर धरलेल्या पावसाचे शुक्रवारपासून ठिकठिकाणी धुमशान सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात नुकसानीच्या घटना घडल्याने नागरिक चिंतेत पडले आहेत. जिल्ह्dयात आज रविवारी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
पूरसदृश परिस्थितीत खबरदारी घेण्याचे आवाहन
आता हवामान तज्ञांनी राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. हवामान विभागाने आज रविवारी कोकण पट्टीतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
14 जून रोजी रत्नागिरी जिह्यात सकाळी 24 तासांपर्यंत एकूण 484.18 मिमी, तर एकूण सरासरी पाऊस -53.79 मिमी. पर्जन्यमानाची नोंद प्रशासनाने केली आहे. त्यात मंडणगड -31.75 मि.मी., खेड - 48.57 मि.मी., दापोली- 47.57 मि.मी., चिपळूण-25.56 मि.मी., गुहागर -22.80 मि.मी., संगमेश्वर -51.91 मि.मी., रत्नागिरी -77.55 मि.मी., लांजा - 58.60 मि.मी., राजापूर - 119.87 मि.मी. इतकी नोंद झाली आहे.