पेडणे, जुने गोवेत दोन नवे रेल्वे बोगदे; पाच वर्षांत कोकण रेल्वेचे दुपदरीकरण; रोज 100 हून अधिक रेल्वेगाड्या धावणार
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी गर्दी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुपदरीकरणाच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत गोव्यातील पेडणे आणि जुने गोवे येथे दोन नव्या रेल्वे बोगद्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून आवश्यक निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.
कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दुपदरीकरणामुळे रेल्वे मार्गाची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून रोज 100 हून अधिक प्रवासी आणि मालवाहू रेल्वेगाड्या धावू शकतील, असे झा यांनी सांगितले.
क्रॉसिंगसाठी होणारा विलंब कमी होणार
सध्या कोकण रेल्वे मार्गाचा बहुतांश भाग एकेरी असल्याने दोन गाड्यांना क्रॉसिंगसाठी काही ठिकाणी थांबावे लागते. दुपदरीकरण झाल्यानंतर ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेग वाढण्यास आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. तसेच रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या टप्प्यात 263 किमी मार्गाचे दुपदरीकरण
संपूर्ण 741 किमी कोकण रेल्वे मार्गापैकी 90 टक्क्यांहून अधिक मार्ग सध्या एकेरी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुढील पाच वर्षांत 263 किमी मार्गाचे ‘पॅच डब्लिंग’ करण्याचे नियोजन आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळूर-गोवा आणि गोवा-वैभववाडी या टप्प्यांच्या दुपदरीकरणासाठी तांत्रिक सर्वेक्षणही सुरू आहे.
पर्यटन आणि मालवाहतुकीला चालना
दुपदरीकरणामुळे कोकण रेल्वेवरील मालवाहतुकीची क्षमता वाढणार असून कोकणातील व्यापार आणि उद्योगांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोवा आणि कोकणातील पर्यटन क्षेत्रालाही या प्रकल्पामुळे चालना मिळेल.
नवीन बोगदे, आधुनिक रेल्वे ट्रॅक आणि वाढलेली वाहतूक क्षमता यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील लाखो प्रवाशांना फायदा होणार असल्याचे संतोषकुमार झा यांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे या तीन राज्यांमधील प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.