टर्मिनससाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा प्रशासनाकडे पाठपुरावा
न्हावेली / वार्ताहर
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे पुन्हा एकदा महत्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा सुरु केला आहे.या मागण्यांमध्ये प्रामुख्याने पुणे सावंतवाडी थेट रेल्वे सुविधा नांदेड पुणे पनवेल गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार आणि सावंतवाडी टर्मिनसच्या अपूर्ण कामाला ' अमृत भारत स्थानक योजनेतून पूर्ण करणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.मुसळधार पावसामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होत आहेत तर काही गाड्या नियोजित स्थानकाऐवजी पनवेल किंवा इतर स्थानकांतून सुटत आहेत.यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.काही गणपती विशेष गाड्या रद्द होण्याची शक्यता असल्याने प्रवासाबाबत अनिश्चितता वाढली होती. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे.मागील तक्रारीच्या निराकरणाबाबत विचारणा करण्यासाठी फोन करण्यात आला होता. यावेळी संघटनेने प्रवाशांच्या अपूर्ण मागण्यांची माहिती दिली.ज्यावर मंत्र्यांच्या कार्यालयाकडून योग्य ती पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत या आश्वासनामुळे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरु असल्याची चिन्हे दिसत आहे.
प्रवाशांसाठी महत्वाच्या सूचना
सद्याच्या अनिश्चित परिस्थितीत प्रवाशांनी आपला प्रवास सुखकर करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रवाशांनी आपला पीएनआर स्टेटस आणि गाडीची वेळ नियमितपणे तपासणे महत्वाचे आहे.त्याप्रमाणे रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी एनटीईएस किंवा रेल्वे या अँप्सचा वापर करण्याचा सल्ला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी यांनी दिला आहे. यामुळे प्रवाशांना वेळेवर अचूक माहिती मिळू शकेल आणि प्रवासातील गैरसोय टाळता येईल.या मागण्या पूर्ण झाल्यास कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गणेशोत्सवा दरम्यान प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे.आता गणेशोत्सव संपत आला असून मुंबईकर चाकरमानी मुंबईच्या दिशेने परतू लागले आहेत.