कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा; मडगावला मुख्यालयासह 19 वा स्वतंत्र झोन द्या; एनआरएमयूची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी
कुडाळ / प्रतिनिधी : कोकण रेल्वेचे पूर्णपणे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करून मडगाव (गोवा) येथे मुख्यालय असलेला भारतीय रेल्वेचा 19 वा स्वतंत्र झोन घोषित करावा, अशी मागणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या (NRMU) वतीने करण्यात आली आहे.
एनआरएमयूचे सरचिटणीस कॉ. वेणू पी. नायर आणि सहकाऱ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पणजी येथील शासकीय कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे विशेष निवेदन साद करण्यात आले.
कॉ. वेणू पी. नायर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर कोकण रेल्वेच्या भविष्यातील प्रशासकीय रचनेबाबत तसेच कर्मचारी आणि रेल्वेच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
मडगावला मुख्यालयाची मागणी
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून मडगावला मुख्यालय असलेला स्वतंत्र 19 वा रेल्वे झोन निर्माण करावा, ही या निवेदनातील प्रमुख मागणी आहे. कोकण रेल्वेचा मोठा भौगोलिक विस्तार असून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना ती जोडते. त्यामुळे स्वतंत्र झोनच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी भूमिका एनआरएमयूने मांडली.
मुख्यमंत्र्यांकडून पाठपुराव्याचे आश्वासन
एनआरएमयूच्या मागण्यांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संघटनेने सादर केलेले निवेदन आणि त्यातील मागण्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मांडून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले.
या मागणीमुळे कोकण रेल्वेच्या प्रशासकीय रचनेबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता असून, केंद्र सरकारच्या पातळीवर याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे रेल्वे कर्मचारी आणि कोकण रेल्वे क्षेत्रातील संबंधितांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला एनआरएमयूचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी जॉन ओमन, वर्किंग प्रेसिडेंट कृष्णा कुमार शेठ, बीजू मोहन, रमाकांत नाडकर्णी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.