कोकणातील कबुलायतदार जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावणार; 4,718 हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गावकर जमिनींचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. आंबोली, गेळे, चौकुळ, नेने, मासुरे आणि केगद या गावांतील सुमारे 4 हजार 718 हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून त्यांना ‘वर्ग 1’ धारणाधिकाराने ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबईतील मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच महसूल आणि वन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये जमिनींचे वाटप झाले आहे. मात्र, उर्वरित गावांमधील काही जमिनींवर वनविभाग तसेच खासगी वन क्षेत्राचे आरक्षण असल्याने प्रक्रिया रखडली आहे. या अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना जमिनींचा ताबा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित गावकऱ्यांना नियमानुसार वनविभागाकडे अपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
गेळेतील 269 कुटुंबांची यादी निश्चित
गेळे येथील 269 कुटुंबांना भूखंड वाटप करण्यासाठी अंतिम पात्रता यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी 253 पात्र कुटुंबांना व्यावसायिक वापरासाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
दरम्यान, चौकुळ, नेने आणि मासुरे येथील जमिनींच्या प्रकरणांत उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांनी महसूल न्यायाधिकरण (एमआरटी), मुंबई येथे अपील दाखल केले आहे. या प्रकरणांतही शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.