कोलकाता बलात्कार घटना पूर्वनियोजित
आतापर्यंतच्या तपासानंतर पोलिसांनी दिली माहिती
वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील दक्षिण कलकत्ता कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी महत्वाची माहिती उघड केली आहे. हे बलात्कार प्रकरण पूर्वनियोजित होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यापैकी 3 जणांनी आधी योजना करुन हा गुन्हा केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या तिघांनी या विद्यार्थिनीवर अनेक दिवसांपासून पाळत ठेवली होती. ते संधीची वाट पहात होते, असे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे.
या प्रकरणी तपास करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी विशेष अन्वेषण दलाची स्थापना केली असून या दलात 9 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थिनीने या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या दिवसापासूनच या तिघांनी तिला सताविण्यास प्रारंभ केला होता. तिला आपल्या वासनेचा बळी करण्याची योजना त्यांनी आधीपासूनच केली होती. संधी मिळताच त्यांनी हे दुष्कर्म केले, असे स्पष्ट करण्यात आले.
बलात्काराचे व्हिडीओ चित्रण
या प्रकरणातील तीन मुख्य आरोपींनी बलात्काराचे व्हिडीओ चित्रण करुन ते एकमेकांना पाठविले, अशी कबुली या प्रकरणातल्या चौथ्या आरोपीने दिली आहे. या आरोपीलाही अटक करण्यात आली असून तो महाविद्यालयाच्या ज्या इमारतीत हा गुन्हा घडला, त्या इमारतीचा सुरक्षा रक्षक होता. त्याचाही या गुन्ह्यात सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
अनेक विद्यार्थिनींचे शोषण
या तीन जणांच्या टोळीने अनेक विद्यार्थिनी आणि महिला यांचे अशा प्रकारे लैंगिक शोषण केले असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. यासंबंधातही तपास केला जात आहे. पोलिसांनी महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्ही फूटेज संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. या फूटेजवरुन या टोळीने पूर्वी केलेले अशा प्रकारचे अपराधही उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढणार असून अनेक गुन्हे बाहेर पडण्याची शक्यता आहे.
कमी गुण असूनही प्रवेश
या प्रकरणातील झैब अहमद या आरोपीसंबंधी विशेष खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपीला कलकत्ता विद्यापीठाच्या कायदा प्रवेश परीक्षेत अतिशय कमी गुण मिळाले होते. तरीही त्याला या प्रतिष्ठित महाविद्यालयात कायदा अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा देण्यात आला, आहे प्रश्न उपस्थित झाला आहे. अहमद याने आपले राजकीय संबंध उपयोगात आणून हा प्रवेश मिळविला आहे काय, याचीही चौकशी केली जावी. त्याला कोण संरक्षण देत आहे, हे तपासले जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ज्यांनी या प्रवेश परिक्षेत उत्तम गुण मिळविले होते, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तथापि, अहमद याला अत्यल्प गुण असतानाही प्रवेश मिळाला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या राज्यात महाविद्यालयीन प्रवेश देतानाही राजकारण केले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाने दिला आहे.
राज्यभर निदर्शने
कोलकाता कायदा विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणी पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळली असून राजधानी कोलकाता आणि राज्याच्या इतर अनेक शहरांमध्ये अनेक क्षेत्रांमधील मान्यवरांनी कायदा-सुव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात अनेक स्थानी निषेध मोर्चे निघाले असून त्यांना सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा यासाठी विविध संघटनांकडून दबाव वाढत आहे.