कोलकाता महापौर हकीम यांचा पदत्याग
वृत्तसंस्था/कोलकाता
विधानसभा निवणुकीत दारुण पराभव झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अनेक धक्क्यांना तोंड द्यावे लागत आहे. बुधवारी या पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हकीम यांनी महापौरपदाचा त्याग केला आहे. त्यांनी आपले त्यागपत्र सादर केले असून कोलकाता शहराच्या महानगरपालिकेला आता काही अर्थ उरला नाही. त्यामुळे पदावर राहण्यात अर्थ नाही, असे वक्तव्य केले आहे. हकीम हे तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्या निकटचे मानले जातात. ते 2018 पासून कोलकाता शहराचे महापौर होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी प्रशासकीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला हकीम यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे 18 नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर त्वरित हकीम यांनी कोलकाता महापौरपदाचा त्याग केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, ते ममता बॅनर्जी यांच्यासमवेतच आहेत, असे स्पष्टीकरण पक्षाकडून करण्यात आले.