For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी थरारक विजय

06:58 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी थरारक विजय
Advertisement

आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी : क्लासनची फटकेबाजी वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव करत आपली विजयी सलामी दिली. या सामन्यात केकेआरने हैदराबाद संघाला विजयासाठी 209 धावांचे तगडे आव्हान दिले. कोलकाता संघातील सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट आणि आंद्रे रसेल यांनी दमदार अर्धशतके झळकाविली. त्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 204 धावा जमविल्या. या सामन्यात हैदराबाद संघातील क्लासनची अर्धशतकी खेळी वाया गेली.

Advertisement

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजी दिली. केकेआर संघाच्या डावाला फिल सॉल्टने दणकेबाज सुरुवात करुन दिली. सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी पहिल्या 2 षटकात 23 धावा झोडपल्या. त्यामध्ये नरेनचा वाटा केवळ 2 धावांचा राहिला. चोरटी धावा घेण्याच्या नादात तो  शहबाज अहमदच्या फेकीवर धावचीत झाला. त्यानंतर हैदराबाद संघातील नटराजन आणि मार्कंडे यांनी भेदक गोलंदाजी केल्याने कोलकाता संघाचे 3 फलंदाज लवकर बाद झाले. नटराजनने वेंकटेश अय्यरला 7 धावांवर तर त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. मार्कंडेने नितीश राणाला त्रिपाठीकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. केकेआरची यावेळी स्थिती 4 बाद 51 अशी होती. फिल सॉल्ट आणि रमनदीप सिंग यांनी पाचव्या गड्यासाठी 54 धावांची भागिदारी केली. कमिन्सने रमनदीप सिंगला झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 35 धावा जमविल्या. मार्कंडेने आपल्या दुसऱ्या हप्त्यातील गोलंदाजीत सलामीच्या फिल सॉल्टला झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावा झळकाविल्या. सॉल्ट बाद झाला त्यावेळी केकेआरचा संघ खूपच अडचणीत होता. पण रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी तुफान फटकेबाजी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. रिंकू सिंगने केवळ 15 चेंडूत 3 चौकारांसह 23 तर रसेलने 25 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 64 धावा झोडपल्या. रिंकू सिंग आणि रसेल यांनी सातव्या गड्यासाठी 32 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. डावातील शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर रिंकू सिंग झेलबाद झाला. स्टार्कने 3 चेंडूत नाबाद 6 धावा जमविल्या. केकेआरला अवांतराच्या रुपात 8 धावा मिळाल्या. केकेआरच्या डावात 14 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. हैदराबाद संघातर्फे नटराजनने 32 धावांत 3 तर मार्कंडेने 39 धावांत 2 तर कमिन्सने 32 धावांत 1 गडी बाद केला. केकेआरने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 3 गडी गमविले. केकेआरचे पहिले अर्धशतक 43 चेंडूत, शतक 71 चेंडूत, दीडशतक 100 चेंडूत तर द्विशतक 116 चेंडूत फलकावर लागले. सॉल्ट आणि रमनदीप सिंग यांनी पाचव्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 27 चेंडूत तर रसेल आणि रिंकू सिंग यांनी सातव्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 22 चेंडूत झळकाविली. आंद्रे रसेलने 20 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह आपले जलद अर्धशतक झळकाविले.

डावाला चांगली सुरुवात

 

मयांक अगरवाल आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्स हैदराबादच्या डावाला चांगली सुरुवात केली. या जोडीने 33 चेंडूत 60 धावांची भागिदारी केली. डावातील सहाव्या षटकात केकेआरच्या हर्षित राणाने सलामीच्या मयांक अगरवालला झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. अगरवाल बाद झाल्यानंतर हैदराबाद संघाने आपला दुसरा गडी पाठोपाठ गमविला. अभिषेक शर्माला आंद्रे रसेलने वरुणकरवी झेलबाद केले. शर्माने 19 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. वरुणने मार्कक्रेमला सिंगकरवी झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. हैदराबाद संघातील सुनील नरेनने राहुल त्रिपाठीला हर्षित राणाकरवी झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 1 षटकारासह 20 धावा जमविल्या. हैदराबाद संघाची यावेळी स्थिती 12.5 षटकात 4 बाद 111 अशी होती. अब्दुल समाद आणि क्लासन यांनी पाचव्या गड्यासाठी 34 धावांची भर घातली. रसेलने समादला अय्यरकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. शहबाज अहमद आणि क्लासन यांनी तुफान फटकेबाजी करत सहाव्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी केल्याने पुन्हा सामन्याला रंगत आली. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षित राणाने शहबाज अहमदला अय्यरकरवी झेलबाद केले. त्याने 5 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. अहमद बाद झाला त्यावेळी हैदराबादला विजयासाठी आणखी 5 धावांची गरज होती. दरम्यान हर्षित राणाने आपल्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्लासनला सुयश शर्माकरवी झेलबाद केले. क्लासनने 29 चेंडूत 8 षटकारांसह 63 धावा झोडपल्या. क्लासन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार कमिन्सला शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती पण कमिन्सला या चेंडूवर एकही धाव घेता न आल्याने कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना केवळ 4 धावांनी जिंकून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

 

सनरायझर्स हैदराबादने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 65 धावा जमविताना 1 गडी गमविला. हैदराबादचे पहिले अर्धशतक 27 चेंडूत तर शतक 52 चेंडूत दीडशतक 103 चेंडूत आणि द्विशतक 115 चेंडूत फलकावर लागले. क्लासनने आपले दणकेबाज अर्धशतक केवळ 25 चेंडूत 7 षटकारांच्या मदतीने झळकाविले. पण ते वाया गेले. हैदराबादच्या डावामध्ये 15 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. केकेआरतर्फे हर्षित राणाने 33 धावांत 3 तर आंद्रे रसेलने 25 धावांत 2 गडी बाद केले. चक्रवर्ती आणि सुनिल नरेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात फलंदाजाने मारलेला चेंडू पंचाच्या पायावर आदळल्याने तो खाली कोसळला. यानंतर या सामन्यातील उर्वरित कालावधीसाठी दुसऱ्या पंचाची नियुक्ती करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक : केकेआर 20 षटकात 7 बाद 208 (सॉल्ट 54, रमनदीप सिंग 35, रिंकू सिंग 23, आंद्रे रसेल नाबाद 64, वेंकटेश अय्यर 7, स्टार्क नाबाद 6, नितीश राणा 9, अवांतर 8, टी. नटराजन 3-32, मार्कंडे 2-39, कमिन्स 1-32), सनरायझर्स हैदराबाद 20 षटकात 7 बाद 204 (क्लासन 63, अगरवाल 32, अभिषेक शर्मा 32, मारक्रेम 18, राहुल त्रिपाठी 20, अब्दुल समाद 15, शहबाज अहमद 16, अवांतर 7, हर्षित राणा 3-33, रसेल 2-25, चक्रवर्ती, सुनिल नरेन प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.