चेअरमन एकटेच बोलले...सभा पळपुटी; गोकुळ संचालिका शौमिका महाडिक
सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धारीष्ट सत्ताधाऱ्यांमध्ये नसल्याचा केला आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकूळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचनानंतर सभासदांचे काही प्रतिप्रश्न आहेत का? हे सत्ताधाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक होते. मात्र सभेमध्ये सुमारे दीड तास चेअरमन एकटेच बोलत राहिले. सभासदांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, त्यामुळे आजची सभा सत्ताधाऱ्यांनी पळपुटे पद्धतीने उरकल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. तसेच सभासदांच्या प -श्नांना उत्तरे देण्याचे धारीष्ट सत्ताधाऱ्यांमध्ये नसल्याची टिका ही महाडिक यांनी केली.
कागल पंचतारांकीत औद्यागिक वसाहतमधील गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे शुक्रवारी गोकुळची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेनंतर सभास्थळाबाहेर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी समांतर सभा घेतली. यामध्ये चार ठराव नामंजूर करत सभासदांचा आवाज दाबल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
सभेमध्ये बोलताना संचालिका महाडिक म्हणाल्या, गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध संकलन कमी झाले असून परजिल्हा व राज्यातून दूध संकलन वाढले आहे. सत्ताधाऱ्यांना आता परजिल्हा व राज्यातून दूध संकलन करुन आपण संघ चालवू शकतो हे लक्षात आले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील दूध संस्थाचे महत्त्व कमी होणार आहे. आजच्या सभेमध्ये असेच चित्र होते, सभासदांचे काही प्रश्न आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्नच सत्ताधाऱ्यांनी केला नाही. तसेच आमच्या काही सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाही. दीड तासाहून अधिक काळा चेअरमन एकटेच बोलत राहिले. बहुदा गडबडीने बोलून त्यांना एखादा विषय रेटायचा असेल असा आरोप महाडिक यांनी केला.
त्यापुढे म्हणाल्या, किमान ५० लिटर दूध संकलनाची असलेली अट रद्द करून गोकुळने आज मोठ्या दूध संस्थांवर अन्याय केला आहे. केवळ मतांसाठी हा घाट घालण्यात आला आहे. तसेच कोणच्या तरी हट्टापायी शिक्षण क्षेत्रात गोकुळ पाय ठेवत आहे. एकीकडे दुध संकलन, विक्री, दुग्धजन्य पदार्थ्यांच्या विक्रीत घट होत असताना यामध्ये सुधारणा करण्याऐवजी ते आता महाविद्यालय सुरु करत आहेत. गोकुळच्या पैशातुन हे महाविद्यालय उभा राहणार आणि ते कोण्याच्यातरी घशात घातले जाणार असल्याचा आरोप महाडिक यांनी केला.
सतेज पाटील यांचे गोकुळबाबत ज्ञान मर्यादित
सत्ताधाऱ्यांचे नेते असलेले आमदार सतेज पाटील यांचे गोकुळबाबतचे ज्ञान मर्यादित आहे. त्यांना केवळ धिंगाणा घालणे आणि गोकुळमध्ये महाडिकांचे टँकर किती इतकेच ज्ञान आहे. गोकुळमध्ये त्यांची सत्ता येण्यापुर्वी ते स्वतः व त्यांचे समर्थक सभेमध्ये वासाच्या दूधावरुन धिंगाणा घालायचे. पण सध्या ते सत्तेत असताना वासाच्या दूध किती काढले या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नसल्याचे संचालिका महाडिक यांनी सांगितले.
अडवणूक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध
गोकुळच्या सर्वसाधारण सभेस विद्यमान संचालिका शौमिका महाडिक सभेसाठी जात असताना त्यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थांचे चेअरमन यांची पोलीस प - शासनाकडून अडवणूक करण्यात आली. तसेच सभेमध्ये संचालिका शौमिका महाडिक या उभ्या होत्या. त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती सत्ताधाऱ्यांनी केली नाही. तसेच त्यांच्यासाठी व्यासपीठावर खुर्ची देखिल ठेवण्यात आली नव्हती, त्यामुळे या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध समांतर सभेत राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केला.