राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या सख्ख्या बहिणींना सांघिक कांस्य
कोल्हापूर :
62 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेतील सांघिक गटात कोल्हापुरातील तेजस्विनी व धनश्री रामचंद्र कदम या दोन सख्ख्या बहिणींचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. बेंगळूरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 200 मीटर पॉवर ट्रॅकवरही स्पर्धा झाली. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत वरिष्ठ महिला गटातून प्रतिनिधीत्व केलेल्या महाराष्ट्र संघात तेजस्विनी व धनश्री यांच्यासह मृगनयणी शिंदे व श्रुतिका सरवदे (दोघी रा. पुणे), कॅरन फर्नाडीस (मुंबई) यांचा समावेश होता. स्केटिंगपटूंच्या वेगाची जणू परीक्षाच घेणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, जम्मु-काश्मीर येथील संघांना भारी कांस्य पदक पटकावले. तेजस्विनी व धनश्री या दोघी कोल्हापुरातील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण वर्ग व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या स्केटिंगपटू आहेत. या दोघींनीही आजवर 16 राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत प्रतिनिधीत्व करत पदकांची लयलुट केली आहे.
आता लवकरच चंदीगडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या भारतीय वरिष्ठ महिला स्केटिंग संघ निवड चाचणीत तेजस्विनी व धनश्री या दोघांना निवडण्यात आले आहे.