राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या शुक्ला बीडकरला रौप्य
कोल्हापूर
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पॅरा महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापुरातील दिव्यांग पॉवरलिफ्टर शुक्ला सात्तापा बिडकर हिने ५१ किलो इतके भारी वजन उचलून रौप्य पदक पटकावले. नोयडा (उत्तर प्रदेश) येथील एमटी विद्यापीठात झालेल्या या स्पर्धेत शुक्लाने महाराष्ट्रातर्फे ४१ किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व केले होते. या ४१ किलो वजन गटातून कर्नाटक, गुजरात, पंबाज, ओडीशा, तामिळनाडू येथील पॉवरलिफ्टर्स सहभागी झाले होते. यापैकी गुजरातमधील महिला पॉवरलिफ्टरने सुवर्ण व कर्नाटकातील पॉवरलिफ्टरने कांस्य पदक मिळवले.
दरम्यान, पंधराच दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडी येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा वरिष्ठ महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शुक्लाने ५० किलो वजन उचलून सुवर्ण पदक मिळवले होते. याही स्पर्धेत तिने ४१ किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व केले होते. स्पर्धेतील सुवर्ण पदकी कामगिरीमुळे पुण्यातील पॅरालॉम्पिक स्टेट ससोसिएशनने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली होती. राष्ट्रीय स्पर्धेतही तिने कोल्हापुरी बाणा दाखवून देत रौप्य पदक पटकावले. या कामगिरीची तिची २३ ते २७ मार्च या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड केली आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती शुक्लाही शाहू साखर कारखान्याची मानधनधारक पॉवरलिफ्टर असून ती बिभीषण पाटील व्यायामशाळेत सराव करत आहे. तिने आजवर राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ३ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य पदक जिंकून राष्ट्रीय पॉवरलिफ्टर म्हणून नाव कमवले आहे. तिला शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शनक बिभीषण पाटील, प्रशिक्षक सारिका सरनाईक व प्रा. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.