राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या राहीचा सुवर्णवेध
२५ मीटर स्पोर्टस् पिस्तूल प्रकारात कामगिरी
स्पर्धेच्या १० फेऱ्यांमधून ३५ गुण कमवत पदकाला गवसणी
कोल्हापूर :
डेहराडून येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर स्पोर्टस् पिस्तूल प्रकारात कोल्हापूरची ऑलिम्पिकवीर नेमबाज राही सरनोबतने अचूक लक्ष्य साधत रविवारी सुवर्णपदक प्राप्त केले. पदकाला गवसणी घालण्यासाठी १० फेऱ्या नियोजित केल्या होत्या. या दहा फेऱ्यांमध्ये तिने इतर नामवंत महिला नेमबाजांना मागे टाकत सर्वाधिक ३५ गुणांची कमाई करून सुवर्ण पदक जिंकले. सहा महिन्यांच्या खंडानंतर राहीने या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे प्रतिनिधीत्व केले आहे.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीची स्पर्धा झाली. या स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारातून भारतातील नामवंत महिला नेमबाजांनी प्रतिनिधीत्व केले होते. सूवर्ण, रौप्य व कांस्य पदकाला गवसणी घालण्यासाठी १० फेऱ्यांमध्ये गुणानुक्रमे वरवढ कामगिरी करणे आवश्यक होते. स्पर्धेसाठी निशाना साधताना झालेल्या पहिल्या ३ फेऱ्यामधील खराब कामगिरीमुळे राही पिछाडीवर राहिली. परंतू याचवेळी तिने संयमाने नेम साधत चौथ्या फेरीपासून आघाडी घेण्यास सुरुवातही केली. सातव्या फेरीत दुदैवाने तिच्याकडील पिस्तुलात तांत्रिक थोडासा बिघाड झाला. हीच संधी ओळखून पंबाजच्या सिमरनप्रीत कौर ब्रार हिने राहीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. राहीनेही पिस्तुलातील बिघाडामुळे ना उमेद न होऊन जाता सातव्यापासून दहाव्या फेरीपर्यंत अतिशय संयमाने निशाना साधण्यास सुरूवात केली. यातून तिला सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यासाठी अपेक्षीत गुण मिळत राहिले. अखेरच्या दहाव्या फेरीतही राहीने उकृष्टच नेम साधला. त्यामुळेच दहा फेऱ्यांमधून तिच्या गुणतालिकेत एकूण ३५ गुण जमा झाले. या गुणांच्या जोरावर राहीचा सुवर्ण पदकावर कब्जा झाला. पंजाबच्या सिमरनप्रीत कौर ब्रार (पंजाब) हिने रौप्य व कर्नाटकच्या एस. विद्या हिने कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या रिया थत्तेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.