For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | रणरणत्या उन्हात कोल्हापूरची 'हिरवी शाल'; बावड्यातील झाडांची रांग ठरतेय प्रवाशांसाठी विसावा!

01:30 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   रणरणत्या उन्हात कोल्हापूरची  हिरवी शाल   बावड्यातील झाडांची रांग ठरतेय प्रवाशांसाठी विसावा
Advertisement

                         कडक उन्हात क्षणभर विश्रांती देणारा बावडा रोड

Advertisement

कोल्हापूर (गौतमी शिकलगार) : सध्या कोल्हापुरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापलेला डांबरी रस्ता आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य, अशा परिस्थितीत प्रवाशांचा जीव कासावीस होणे स्वाभाविकच. मात्र, याच रणरणत्या उन्हात कोल्हापुरात शिरताना कसबा बावड्याच्या पुढे जेव्हा प्रवाशांची पावले पडतात, तेव्हा त्यांना अनुभवायला मिळते निसर्गाचे एक अनोखे वरदान!रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या रांगा एखाद्या हिरव्या कपाटासारख्या उभ्या आहेत. उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघालेल्या प्रवाशांसाठी ही झाडे म्हणजे फक्त झाडे नसून, साक्षात 'सुखाची सावली'ठरत आहेत.

कोल्हापुरात प्रवेश करण्यापूर्वी मिळणारा हा विसावा प्रवासाचा सारा थकवा क्षणार्धात दूर करतो.बावडा मार्गावरून शहरात येताना रस्त्याच्या कडेला असलेल्या या झाडांची सावली रस्त्यावर जणू काही नक्षीकाम केल्यासारखी वाटते. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना उन्हाचा चटका बसत असताना, या भागात शिरताच तापमानात जाणवणारी घट मनाला उभारी देते. या रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार या सावलीचा आनंद घेण्यासाठी आपोआप गाडीचा वेग कमी करतात, तर काही जण आवर्जून या झाडाखाली थांबून पाणी पिण्यासाठी किंवा क्षणभर विश्रांती घेण्यासाठी विसावतात. कडक उन्हात ही झाडे एखाद्या सावली देणाऱ्या छत्रासारखी प्रवाशांचे रक्षण करतात. लांबचा प्रवास करून येणाऱ्यांसाठी ही 'निसर्गनिर्मित AC च' आहे. झाडांच्या पानांतून येणारी वाऱ्याची झुळूक आणि डोळ्यांना मिळणारा हिरवा गारवा, कडक उन्हातही मन प्रसन्न आणि गार करून जातो.

Advertisement

बावड्यातील ही दृष्ये आजच्या सिमेंटच्या जंगलात झाडांचे महत्त्व किती आहे, याची साक्ष देतात. पाणी जपून वापराआणि झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त नारे नसून ती काळाची गरज आहे, हे या सावलीत थांबणारा प्रत्येक प्रवासी मनोमन मान्य करतो. आज जेव्हा जग ग्लोबल वार्मिंगच्या संकटाशी लढत आहे, तेव्हा बावड्यातील या झाडांच्या रांगा आपल्याला जगण्याचा नवा मंत्र देतात. कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे हे हिरवे स्वागत शहराच्या सौंदर्यात भर तर टाकतच आहे, पण त्याचबरोबर निसर्गाप्रती आपली कृतज्ञताही व्यक्त करत आहे.

Advertisement
Tags :

.