कोल्हापुरातील पहिली महिला फुटबॉल पंच : सिद्धी शेळके
कोल्हापुरी फुटबॉल वैभवात घडला इतिहास : विफा आयोजित पंच परीक्षेत मिळवले उत्तम यश, प्रशिक्षणासंबंधीचे ई लायसन्स सर्टिफिकेट व एनआयएस कोच कोर्समध्ये केले यश संपादन
कोल्हापूरः संग्राम काटकर
गेल्या दोन दशकांपासून कोल्हापुरात शेकडो मुली फुटबॉल खेळत आहेत. घरच्यांनी दिलेल्या पाठिंबामुळे त्यांनी मैदानात जाऊन फुटबॉल खेळण्यासाठी घरचा उंबरठा ओलांडला आहे. पाचगावमधील सिद्धी रविंद्र शेळके ही त्यापैकीच एक महिला फुटबॉलपटू. छत्रपती शाहू विद्यालयातून तिने राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. फुटबॉलचा सराव करत तिने फुटबॉलमध्येच करिअर करण्याचे पक्के केले. पंच परीक्षा दिली आणि त्यात यशस्वीही झाली. आणि क्रीडानगरी कोल्हापुरातील पहिली वहिली महिला फुटबॉल पंच नावारूपाला आली आहे. एक साईड ह्यू म्हणून तिने फुटबॉल प्रशिक्षणाशी संबंधीत ई सर्टिफिकेट लायसन्स व एनआयएस कोचचा कोर्स करून त्यातही यश मिळवले आहे.
कोल्हापूरी फुटबॉलला चालना देणारे छत्रपती शाहू स्टेडियम हे कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचे एक वैभव आहे. याच स्टेडियममध्ये मंगळवार पेठेतील सिद्धीचे पणजोबा भीमराव दळवी यांनी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, बालगोपाल तालीम मंडळ व जय भवानी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट या फुटबॉल संघांचे गोलकीपर म्हणून कारकिर्द गाजवली आहे. जुन्या काळातील प्रसिद्ध फुटबॉल पंच म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. सिद्धीचे आजोबा राजेंद्र दळवी हे देखील प्रॅक्टिस फुटबाल क्लब व दिलबहार तालीम मंडळाचे गोलकिपर होते. त्यांनी राष्ट्रीय पंच बनून कोल्हापूरसह उर्वरित महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय पंच म्हणून नावही कमवले. सिद्धीचे वडील रविंद्र हे देखील जय भवानी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट व प्रॅक्टिस क्लबचे माजी खेळाडू असून त्यांनी गेल्याच वर्षी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) आयोजित सी लायसन्स सर्टिफिकेट फुटबॉल कोचचा कोर्स पूर्ण करून कोणत्याही संघाला प्रशिक्षण देण्यासाठीची आपली योग्यता सिद्ध केली आहे. घरातील ही सर्व फुटबॉल परंपरा उरात बाळगून सिद्धी शेळके ही दळवी आणि शेळके कुटुंबातील चौथ्या पिढीच्या रूपाने फुटबॉल मैदानामध्ये उतरली. तिने छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षणाचे धडे घेत घेत फुटबॉल खेळायला सुरुवात केली. छत्रपती शाहू स्टेडियम व छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये केलेल्या सरावाच्या जोरावर छत्रपती शाहू विद्यालयातर्फे शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत खेळायला सुरूवात केली. विद्यालयाच्या संघातून राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी ही मिळवली.
पंचगिरी करण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल...
कॉमर्स कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पंचगिरीमध्ये करिअर करण्याचे ठरवले. सामन्यात पंचगिरी करताना फुटबॉलपटूंसोबत पंचांनाही जोमाने धावावे लागते. एखादा निर्णय चुकल्यास फुटबॉलप्रेमींचा रोष अंगावर येणार हे उघड असते. याची जाणिव ठेवत सिद्धीने छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात धावण्यासह फिजिकल फिटनेसचाही सराव सुरू केला. पंचगिरीच्या नियमांमधील बारकावे जाणून घेतले. आई विद्या व वडील रविंद्र शेळके यांच्याशी चर्चा करून सिद्धीने पंचगिरीची परीक्षा देण्यालायक स्वत:ला सक्षम केले. एक साईड ह्यू म्हणून २०२१ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित ई लायसन सर्टिफिकेट फुटबॉल कोचचा कोर्सही केला. कोर्सअंतर्गत घेतलेल्या लेखी व प्रात्यक्षिकांशी संबंधीत परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशिक्षक बनण्याची तिने मान्यता मिळवली. दरम्यानच्या काळात २०२२ साली मुंबईत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने पंच परीक्षा घेतली. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या माध्यमातून सिद्धीने मुंबईत जाऊन लेखी व फिजिकल फिटनेसची परीक्षा दिली. त्यात तिने यश मिळवले आणि तिच्या रूपाने कोल्हापुरातील पहिली महिला फुटबॉल पंच कोल्हापुरी फुटबॉल वैभवात इतिहास रचला गेला. तिने रायगड येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतून प्रत्यक्ष मैदानातील पंचगिरी करायला सुरूवात केली. या स्पर्धेत केलेल्या मुख्य व सहाय्यक पंचगिरीमुळे तिला बऱ्यापैकी अनुभव मिळाला. त्याच्या जोरावर तिने पुणे, चिपळूण, पालघर व जळगाव येथे झालेल्या आंतरजिल्हा १४ व १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतही नेटाने मुख्य व सहाय्यक पंचगिरीची कामगिरी बजावली. लोणिरे (जि. रायगड) अखिल भारतीय पातळीवरील अश्वमेध क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल स्पर्धेतही विद्यापीठीय महिला फुटबॉल स्पर्धेत पंचगिरीची करण्याची संधी मिळाली. सामन्यात बिनचुक निर्णय देत मोठा अनुभव मिळवला. गेल्या डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ या कालावधीत कोलकातामध्ये येथे जाऊन सिद्धीने ६ आठवड्यांचा एनआयएस फुटबॉल कोचचा कोर्स पूर्ण करून त्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेतही यश मिळवले आहे. या यशामुळे ती भविष्यात पंचगिरी करतानाच संघांना प्रशिक्षण देण्याचीही जबाबदारी पार पाडू शकणार आहे.
राष्ट्रीय पंच बनणार...
पंचगिरी आणि प्रशिक्षणातील कोर्च पूर्ण करून त्यात यशस्वी होण्यासाठी केएसएचे पेट्रन-इ-चिफ खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, केएसएचे अध्यक्ष व एआयएफएफचे कार्यकारिणी सदस्य मालोजीराजे छत्रपती, एआयएफएफच्या महिला समिती सदस्य मधुरिमाराजे छत्रपती, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव व पंच सुनील पोवार, प्रदीप साळोखे यांच्याकडून सतत मार्गदर्शन मिळत राहिले. शिवाय विविध स्पर्धांमध्ये पंचगिरी करून मला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. त्याच्या जोरावर राष्ट्रीय महिला पंच बनण्याचे पक्के केले आहे. त्यासाठी विभागीय क्रीडा संकुलात सरावही करत आहे. त्या दृष्टीने विभागीय क्रीडा संकुलात रोज सराव करत आहे.
सिद्धी शेळके (महिला फुटबॉल पंच)