कोल्हापूरकर घामाघूम
कोल्हापूर :
दिवसभर ढगाळ वातावरण त्यात दमट हवा यामुळे सोमवारी कोल्हापूरकर घामाने ओलेचिंब झाले. प्रचंड उष्म्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले. उष्मा आणि बदलेल्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
शहराचे तापमान कधी 38 अंश सेल्सियपर्यंत जात आहे तर कधी त्यामध्ये घट होऊन 35 अंश सेल्सियसपर्यंत खाली येत आहे. 15 मार्च रोजी तापमान 36 अंश सेल्सियस इतके होते. रविवारी 16 मार्च रोजी त्यामध्ये वाढ होऊन 37.9 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. 17 मार्च रोजी पुन्हा तापमानात घट होऊन 35.8 अंश सेल्सियस इतके खाली आहे. तापमानात चढ -उतार होत असला तरी उकाडा कमी होताना दिसत नाही. उलट उष्म्यामध्ये सतत वाढ होत आहे.
गेल्या चार दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे.दिवसभर ढगाळ वातावरण होत आहे. यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होऊन नागरिकांची घुसमट होत आहे. प्रचंड उष्म्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. सोमवारी तर उकाडयाने कोल्हापूरकर प्रचंड त्रस्त झाले. या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे आरोग्य विभागाने अशा वातावरणात अति थंड पाणी आणि शीतपेये पिणे टाळण्याचे तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
- तापमान
कमाल 35.8
किमान-23.1