कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा
कोल्हापूर :
कोल्हापूरी चप्पलला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केली आहे. प्राडा या इटालियन कंपनीने फॅशन शो मध्ये कोल्हापूरी चप्पल हे लेदर सँडल या नावांने प्रसिध्द केल्याने कोल्हापूरातील चर्मकाऱ्यांवर अन्यायाची भावना निर्माण झाली होती. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर चेंबरकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते.
याबाबत कोल्हापूर चेंबरने ताबडतोब प्राडा ला याप्रश्नी पत्रव्यवहार करुन चुक दुरुस्त करण्याची सूचना केली. तसेच खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेत घेऊन, कोल्हापूरी चप्पलला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणेसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. खासदार महाडिक यांनी वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन, कोल्हापूरी चप्पलला आंतराराष्ट्रीय स्तरावर मान्यतेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केलेल्या सूचनेला प्राडा या कंपनीने नुकताच पत्रव्यवहार करुन ही चुक दुरुस्त करत मान्य केले. प्राडा पुरुषांच्या फॅशन शो मध्ये दर्शविलेल्या चपला या पारंपारिक भारतीय हस्तनिर्मित आहेत. ज्याचा शतकांपूर्वीचा वारसा आहे. आम्ही अशा भारतीय हस्तकलेचे सांस्कृतिक महत्व कायम मानतो. सध्या संपूर्ण डिझाइन विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असून त्यापैकी कोणत्याही कलाकृतींचे उत्पादन किंवा व्यापारीकरण झालेली नाही. आम्ही याबाबतीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चरच्या संपर्कात आहोत. आम्हाला तुमच्यासमवेत एकत्रित चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यास आनंद होईल. या दृष्टीकोनात, आम्ही संबंधित प्राडा टीम्ससह पुढील चर्चा आयोजित करू असे प्राडा समूहाचे संयुक्त सामाजिक जबाबदारीचे प्रमुख लोरेंझो बर्टेली यांनी कोल्हापूर चेंबरला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे.
कोल्हापुरी चप्पल ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने पाठविलेल्या पत्रकात म्हंटले आहे.सोबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने प्राडा ला पाठविलेल्या पत्राची प्रत व प्राडा ने दिलेल्या उत्तराची प्रत सोबत जोडली आहे.