Kolhapuri Chappal News: कोल्हापुरी चप्पलची नक्कल, कारागिरांचा संताप
कोल्हापुरी रांगडेपणा आणि कोल्हापूरी चप्पल यांचे अतूट नाते यातून स्पष्ट होते
By : इंद्रजित गडकरी
कोल्हापूर : जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडाने नुकतीच पारंपरिक कोल्हापुरी चप्पल हुबेहूब नक्कल करून ती स्वतःच्या ब्रँडने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आणल्याच्या आरोप होत आहे. यानिमिताने कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली.
यानिमित्ताने चप्पलची रचना, पारंपरिक पद्धती आणि सांस्कृतिक ओळख लपवून सुरू असलेली विक्री किंवा प्रदर्शन हे तर 'सांस्कृतिक अपहार असून, या घटनेने कोल्हापूरच्या कारागिरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोल्हापुरी रांगडेपणा आणि कोल्हापूरी चप्पल यांचे अतूट नाते यातून स्पष्ट होते.
कोल्हापूरी गुळाचा गोडवा आणि कोल्हापुरी पायताणची करकर हीच कोल्हापुराची एक प्रकारे सांस्कृतिक ओळख आहे. मात्र कोल्हापुरी चपलेचा व्यवसाय असंघटित असल्याने बदलत्या काळात तांत्रिक आणि नियमावलीच्या कचाट्यात सापडत आहे.
प्राडा या जगप्रसिध्द ब्रँड्ने कोल्हापुरी चप्पलेचा चप्पल ब्रँड असला तरी त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात पेंटट नसल्याने सहजपणे प्रतिकृती केली. कोल्हापुरात दोन हजारापासून पाच हजारापासून असणारी चपलाची किंमत जागतिक बाजारात लाखापर्यंत असू शकते हे प्राडाच्या प्रदर्शनात स्पष्ट झाले. यावरून पुन्हा कोल्हापुरी चप्पल ब्रॅंड, कोल्हापुरी बाणा, अशा अर्थाने चर्चा रंगू लागली.
२२-२३ हजार कारागिरांची फसवणूक
कोल्हापूर शहर आणि परिसरात सध्या जवळपास २२ हजार ते २३ हजार कारागीर कोल्हापुरी चप्पल तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. शहरात ३०० ते ३५० दुकाने कोल्हापुरी चप्पल विक्री करतात.
या परंपरेने कोल्हापूरचे नाव जगभरात पोहोचवले आहे. कोल्हापुरात न घेता, जागतिक ब्रॅंडने थेट त्याच डिझाईनचा वापर करून चप्पल सादर करणे हे सांस्कृतिक आणि व्यावसायिक फसवणूक असल्याची तीव्र प्रतिक्रिया येत आहे.
जीआय मानांकन असूनही दुर्लक्ष
कोल्हापुरी चप्पलला २०१९ साली जीआय टॅग (जीओग्राफिकल इंडिकेशन) म्हणजेच भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. याचा अर्थ असा की, ठराविक भौगोलिक क्षेत्रात तयार होणारे विशिष्ट उत्पादने जसे की कोल्हापुरी चप्पल हीच त्या नावाने ओळखली जाऊ शकतात. जीआय टॅग मिळाल्यानंतर ती चप्पल कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकातील विशिष्ट कारागिरांनी विशिष्ट पद्धतीने तयार केलेली असावी लागते.
कोल्हापुरी चप्पलाचा अपहार
प्राडाने जी चप्पल तयार केली, ती कोल्हापुरी डिझाईनची सरळ सरळ अपहार आहे. जीआय टॅगनुसार त्यांना कोल्हापुरात येऊन ही चप्पल खरेदी करायला हवी होती. मात्र, त्यांनी परस्पर ही नक्कल करून ती चप्पल एक लाख वीस हजार रुपये इतक्या अवास्तव दरात विक्रीसाठी ठेवली आहे, हे धक्कादायक आहे.
जागतिक दरारा
कोल्हापुरी चप्पल ही केवळ देशातच नव्हे, तर अमेरिका, पॅरिस, लंडन, फ्रान्स यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. या चप्पतेच्या मागे शतकानुशतके जतन केलेली पारंपरिक रचना, टिकाऊपणा आणि हस्तकलेचे कौशल्य आहे.
जीआय टॅग म्हणजे काय ?
जीआय टॅग म्हणजे जीओग्राफिकल इंडिकेशन एखाद्या उत्पादनाचे विशिष्ट भौगोलिक उगमस्थान, त्याचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा, त्याच्या निर्मितीचे खास तंत्र आणि त्या मागाशी जोडलेली ओळख हे दाखवणारा अधिकार. उदाहरणार्थ दार्जिलिंग टी, बनारसी साडी, नागपूर संत्री, अल्फोन्सो आंबा, आणि कोल्हापुरी चप्पल ही सर्व उत्पादने त्यांच्या स्थानाशी जोडलेली असतात. GI मानांकन मिळाल्यानंतर त्या उत्पादनांची नक्कल करणे, दुसऊया ठिकाणी तयार करून मूळ नाव वापरणे हे कायदेशीर गुन्हा ठरतो.
संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करीन
"कोल्हापुरी चप्पलला जर पेटंट अर्थात जीआय मानांकन प्राप्त असेल, तर कोणतीही अडचण नाही. अशा उत्पादनांची नक्कल करणाऱ्याांविरोधात कायदेशीर कारवाई करता येते. कोल्हापूरचा अँड परदेशी कंपन्या स्वतःच्या नावाने वापरत असतील, तर यावर ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. मी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करीन."
- शरद पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट
ब्रॅंड्सनी अस्सलतेचा सन्मान करावा
"संभाजीराजे यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "जर प्राडाने कोल्हापुरी चप्पलची अस्सलता जपत, स्थानिक कारागिरांशी सहकार्य करून आणि जीआय नियमांचे पालन करून ही चप्पल विक्रीसाठी आणली असती, तर आम्ही तिचे स्वागत केले असते. मात्र, मूळ ओळख नोंद न करता सरळसरळ व्यावसायिक नफा कमविणे, हा सांस्कृतिक अपमान आहे."
- संभाजीराजे छत्रपती, माजीkolhapur खासदार
कोल्हापुरी चप्पल प्रकरणी चेंबरचे निवेदन
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पलला पेटंट मिळावे, न्याय मिळावा यासाठी लक्ष घालण्याची कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रिजच्या शिष्टमंडळाने खासदार धनंजय महाडीक यांना निवेदन दिले याबाबत संसदेत लक्षवेधी मांडू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. यावेळी अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, सचिव अजित कोठारी उपस्थित होते.