जिल्हा परिषद शाळांना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी देणार; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
‘माझी शाळा, सुंदर शाळा’अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण; शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प व संरक्षक भिंती बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन करुन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिह्यातील शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवून राज्यात अग्रेसर बनावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सन 2023-24 जिल्हास्तरीय गौरव पुरस्कारांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील माजी सदस्य, पदाधिकारी, पुरस्कारार्थी, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हा व तालुका स्तरावरील विजेत्या शाळांना पारितोषिक तसेच जलजीवन मिशन अंतर्गत विविध स्पर्धांच्या बक्षीसाचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मच्रायांना जलजीवन मिशनचा लोगो आणि डिझाईन वापरुन तयार केलेले टी-शर्ट आणि कॅप चे अनावरण करण्यात आले.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. त्या काळात मुलींची शाळा काढण्याचे महत्वपूर्ण कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. शिक्षणासाठी आपल्या संस्थानातील 90 टक्के हिस्सा खर्च करणारे राजर्षी शाहू महाराज हे दूरदृष्टी असणारा राजा होते. राजर्षी शाहू महाराजांमुळे ओळखला जाणारा आपला जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
जिह्यातील अधिकाधिक शाळा स्वच्छ व सुंदर होण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळेच्या मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह, शाळांचे बांधकाम, विद्युत व्यवस्था व अन्य सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, जिह्यातील शाळांमध्ये वृक्षलागवड करण्यात आल्यामुळे पर्यावरण रक्षण होत आहे, मात्र लावलेली झाडे जगवण्याचे काम आवर्जून व्हावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर नल.. हर घर जल’ योजना राबविण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मानले. सूत्रसंचालन संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी केले.