खासगी कंपनीतील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
खोची : बुवाचे वठार येथील दीपाली विनायक पाटील (वय ३३) या महिलेने खासगी कंपनीत एका जोडप्याकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत वडगाव पोलिसात संशयित जोडप्या विरोधात गुन्हा दाखल केला.पती विनायक पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
मयत दीपाली या संभापूर येथील एका खासगी कंपनीत कामास जात होत्या. तेथे त्यांच्या समवेत कामावर असलेल्या किरण व त्यांच्या पत्नी (पूर्ण नावे माहीत नाही) हे त्यांना शारीरिक, मानसिक त्रास व मोबाईलवरून वारंवार धमक्या देत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून दीपालीने सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घरात आत्महत्या केली, अशी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संशयित आरोपी किरण आणि त्याची पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलील इनामदार करत आहेत. ग्रामस्थांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तेथे मयत घोषित केले. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. पहाटे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपालीच्या पश्चात पती, लहान मुलगा, मुलगी, सासू -सासरे असा परिवार आहे. दीपाली ही बुवाचे वठार येथीलच असून तिचा गांवातील विनायकशी प्रेम विवाह झाला होता.