Kolhapur Rain Update : कोल्हापुरातील 6 बंधारे पाण्याखाली, पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट
शुक्रवारपासून प्रशासनाकडून बंधाऱ्यांचे बरगे काढण्याचे काम सुरु
कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरुच राहिली. गेले चार ते पाच दिवस सुरु असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी 17.05 फुटांवर होती. राधानगरी धरणात 46.49 टक्के इतका पाणीसाठा आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ सुरुच असल्याने जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीचे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात यंदा मे महिन्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची मे अखेरीस खरीपाच्या पूर्व मशागतीची लगबग सुरु होते. मात्र यंदा सतत पाऊस सुरुच असल्याने बळीराजाची शिवारातील पूर्व मशागतीची लगबग ठप्प आहे. त्यामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडणार असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
बंधाऱ्यांचे बरगे काढण्याचे काम सुरु
जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे बरगे काढण्यात आलेले नव्हते. त्यामुळे बंधारे ओव्हरफ्लो होत होते. त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारपासूनच बंधाऱ्यांचे बरगे काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
शहरात वृक्ष कोसळण्याचे सत्र सुरुच
शहरात वळीव पावसाच्या तडाख्यात झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी हनुमान नगर, बापूरामनगर कळंबा आणि रंकाळा टॉवर परिसरात वृक्ष कोसळले. महापालिकेने हे वृक्ष हटवून वाहतूक सुरळीत केली.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा :
- राधानगरी....................................46.49
- तुळशी........................................51.50
- वारणा.........................................39.26
- दूधगंगा.......................................18.39
- कासारी.......................................27.80
- कडवी.........................................40.48
- कुंभी...........................................44.44
- पाटगांव.......................................38.75
- चिकोत्रा......................................48.48
- चित्री..........................................31.19
- जंगमहट्टी....................................34.46
पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात पुढील दोन दिवस हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर शहरी भागात यलो अलर्ट आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस घाट क्षेत्रात मुसळधार तर शहरी भागात अधून मधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.