For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉटेलमध्ये सुरक्षित होतो, मात्र क्षणाक्षणाला..., पर्यटकांनी सांगितला थरारक अनुभव

11:52 AM Apr 24, 2025 IST | Snehal Patil
हॉटेलमध्ये सुरक्षित होतो  मात्र क्षणाक्षणाला     पर्यटकांनी सांगितला थरारक अनुभव
Advertisement

या क्षणी विमानतळाइतके दुसरे सुरक्षित ठिकाण काश्मीरमध्ये नसल्याने आम्ही विमानतळाबाहेर येऊन थांबलो

Advertisement

कोल्हापूर : काश्मीरचे सृष्टीसौंदर्य आम्ही भरभरून पाहिले. पण काश्मीरमधील दहशतीचे वातावरण कसे असते हे पहलगामच्या हल्ल्यानंतर काल आम्ही अनुभवले. काल दुपारनंतर हळुहळू रस्त्यावर सन्नाटा पसरत गेला. सगळे व्यवहार बंद होत गेले. आणि आमच्या टूर व्यवस्थापकांनी आम्हाला कोणताही वेळ न दवडता श्रीनगरमध्ये हॉटेलला पोहोचवले. त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, पण या क्षणी विमानतळाइतके दुसरे सुरक्षित ठिकाण काश्मीरमध्ये नसल्याने आम्ही विमानतळाबाहेर येऊन थांबलो आहे. काश्मीरला पर्यटनासाठी सहकुटुंब गेलेले कोल्हापूरचे युवराज साळोखे आपला अनुभव ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगत होते.

कोल्हापूरचे युवराज साळोखे आणि त्यांचे नऊ जणांचे कुटुंब काश्मीर पर्यटनासाठी गेले आहेत. काल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून ते सुखरुप बचावले. मात्र पहलगामच्या घटनेनंतर साऱ्या काश्मिरात पसरलेला सन्नाटा ते अनुभवत आहेत. याबाबत साळोखे म्हणाले, आम्ही सोमवारी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलो होतो. ते मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. काल रात्रीच आमचे परतीचे विमान होते. पण दुपारनंतर काहीतरी वेगळे जाणवायला लागले. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, हे तर आम्हाला माहितही नव्हते. पण रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत गेली. दुकाने बंद होऊ लागले सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स, लष्करी जीप वेगाने जाताना दिसू लागल्या.

Advertisement

काहीतरी घडलंय याचा पक्का अंदाज आम्हाला आला, पण तो अनुभव घेत फिरण्यापेक्षा आमचे टूर व्यवस्थापक प्रकाश पसारे यांनी हॉटेलमध्येच आम्हाला परत नेण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमध्ये म्हणजे चार भिंतीच्या आत आम्ही जरूर होतो पण हॉटेलवरही दहशतवादी हल्ला करतील अशी अनामिक भीती क्षणाक्षणाला आम्हाला जाणवत होती. काश्मीरमध्ये टीव्हीवर पहलगामचे वृत्त दाखवले जात नव्हते. त्यामुळे नेमके काय झाले हे आम्हाला माहित नव्हते. त्या अवस्थेत आम्ही रात्र काढली आणि आज परत कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला. पण आम्हीच नव्हे तर काश्मीरमधील अन्य पर्यटकही याच निर्णयाला पोहोचले होते.

हॉटेलसोडून प्रत्येकजण विमानतळाकडे जात होते. त्यामुळे विमानांची वेळापत्रक बिघडले गेले. आम्हाला आजचे म्हणजे बुधवारी रात्री साडेनऊचे दिल्लीला जाणाऱ्या विमानाची तिकिटे मिळाली. पण आम्ही रात्री 9.30 वाजता विमान असले तरी आज सकाळीच आम्ही हॉटेल सोडून विमानतळावर येऊन बसलो. बघतो तर काय विमानतळावर प्रचंड गर्दी. त्यामुळे आम्हाला आत घेतले नाही. आम्ही बाहेरच थांबलो. देशभरातून आमच्यासारखे आलेले पर्यटकही विमानतळाकडे धाव घेत होते. एकदा येथून बाहेर पडायचे हीच इथल्या सर्व पर्यटकांची इच्छा होती.

संकटाच्या वेळी आपण आपल्या माणसात आलो याचीही एक समाधानाची भावना आहे. युवराज साळोखे यांच्यासोबत राजू पाटील व त्यांचे कुटुंबीयही आहे. राजू पाटील यांनी तर कालपासून रंगवलेले काश्मीर म्हणजे क्षणाक्षणाला छातीत धडधड निर्माण करणारे होते. ते म्हणाले, काश्मीरचे सौंदर्य पाहून आम्हाला आणखी दोन दिवस काश्मीरमध्ये राहण्याची इच्छा झाली होती. पण सुंदर काश्मीरच्या सुंदर चेहऱ्यामागे दडलेला हा भेसूर हल्ल्याचा चेहरा पाहून कधी एकदा हे काश्मीर सोडतोय एवढेच आता आमच्या मनात आहे.

Advertisement
Tags :

.