ऊन पावसाच्या खेळात रंगला ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळा
जवळपास 25 हजारपेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती; टाळ-मृदंगाच्या गजराने दिंडी मार्ग दुमदुमला
कोल्हापूर प्रतिनिधी
‘ज्ञानोबा माउली, ज्ञानराज माउला तुकाराम’, ‘ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम’ चा गजर करीत भाविक ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सकाळपासून सुरू असलेल्या ऊन सावलीचा आनंद घेत, टाळ-मृदंगाच्या निनादात दुपारी अडीज वाजता संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पुईखडी येथील रिंगणस्थळी टाळ्यांचा कडकडाटात अन् हरिनामाचा जयघोषात स्वागत केले. बुधवारी वारकऱ्यांच्या अमाप उत्साहात पुईखडी येथे माउलींच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले. रिंगण सोहळयात माउलींच्या अश्वाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. दोन्ही अश्वांनी रिंगणास पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर टापाखालची माती कपाळास लावण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले.
विठ्ठला तू मायबापा, विठू माउली तू माउली सुखाची’, यासह शेकडो अभंग भक्तीगीते गात वारकरी नंदवाळकडे जात होते. कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत वारकऱ्यांचा प्रचंड सहभाग होता. भक्त मंडळ ट्रस्टने आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. सलग सात तास सुरू असलेल्या दिंडीत 25 हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. यामध्ये वारकरी, विणेकरी, मृदंगधारी, टाळकरी व तुळशी वृंदावन डोक्यावर घेवून जनाबाईच्या वेशभूषेतील महिला, भजनी मंडळे यांचा सहभाग होता. ज्ञानोबा माउली, ज्ञानबा तुकारामचा नामजप करत वारकरी पुढे सरकत होते. कोल्हापूर ते नंदवाळपर्यंतचा दिंडी मार्ग टाळमृदंगाच्या गजराने दुमदुमला होता. त्यामध्ये अधून- मधून पावसाच्या सरीही बरसत होत्या. ऊनपावसाचा आनंद लुटत वारकरी हरीनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. खोलखंडोबा येथे उभे रिंगन पार पडल्यानंतर पालखी पुढे गेली. अनेकांनी विठ्ठल, रखुमाई, वासुदेव, जनाई, तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वेशभूषा केल्या होत्या. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करीत भक्तांनी माउलीचे दर्शन घेतले. पुईखडी येथे पालखी गेल्यानंतर खासदार श्रीमंत शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते माउलीचे दोन अश्व व पालखीचे पूजन केले. पुईखडी येथे गोलरिंगण सोहळा झाल्यानंतर माउलींच्या पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले. यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, पुष्कराज क्षीरसागर, माऊली पालखी भक्त मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार, उपाध्यक्ष दीपक गौड, अॅङ राजेंद्र केळकर, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, प्रवचनकार एम. पी. पाटील-कावणेकर, चोपदार आनंदराव लाड, अश्वांची सेवा देणारे, संतोष रांगोळे आदी उपस्थित होते.
मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराजवळ फुलांनी सजवलेल्या सागवानी लाकडाच्या पालखीत संत ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती, ज्ञानेश्वरी व पादुका ठेवून मान्यवरांच्या हस्ते पालकीचे पुजन केले. त्यानंतर दिंडीने बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, खोलखंडोबा, जुना वाशी नाका, राजकपूर पुतळा, क्रशर चौकमार्गे प्रतिपंढरपूर नंदवाळकडे प्रस्थान झाले. दिंडी मार्गावर वारकऱ्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करीत ठेका धरला तर काहींनी फुगड्या घातल्या. शिवाय दिंडी मार्गाला येऊन जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवरुन वारकरी, भाविक, भजनी मंडळे स्वयंस्फुर्तीने दिंडीत सहभागी होत होते. लहानांपासून ते अबालवृध्दांपर्यंत भाविक दिंडीत सहभागी झाले होते. दिंडी मार्गावर वारकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी जात होत्या. संपूर्ण दिंडीमार्ग विठ्ठलमय झाला होता. दिंडी नंदवाळ येथे पोहोचल्यानंतर तेथील विठ्ठल मंदिराच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दिंडीतील पालखीमधील ज्ञानेश्वरांची मूर्ती व पादुकांना सोबत घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या. तसेच मंदिरात ज्ञानेश्वर माउलींच्या मूर्तीचा हार विठ्ठलाच्या चरणी तर विठ्ठलाचा हार ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करुन विठ्ठलाची आरती केली. तसेच मंदिरासह नंदवाळमधील अनेक नागरिकांनी आपल्या परीने दिंडीकऱ्यांचा पाहुणचार केला.
उपवासाचे पदार्थ वाटप व आरोग्य सुविधा
विठ्ठल दर्शनाच्या ओढीने कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडीतील भाविकांसाठी दिंडी मार्गात ठिकठिकाणी उपवासाची खिचडी, केळी, राजगिरा लाडू, पाण्याची बॉटल, चहा वाटप सुरू होते. तसेच भाविकांना प्राथमिक आरोग्य सुविधाही पुरवण्यात आल्या. या सुविधा विविध कंपन्या, मंडळे, संस्था, उद्योजकांनी स्वयंस्फुर्तीने पुरवल्या. भाविकांनी या सुविधांचा लाभ घेतला. तसेच दिंडी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. वारकऱ्यांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने के. एम. टी. तर राज्य परिवहन महामंडळाकडून जादा एस. टी. गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
पुढच्यावर्षी चांदीचा रथ
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चांदीचा रथ तयार करून देण्याची घोषणा केली होती. परंतू या रथाचे काही काम बाकी असल्याने यंदा त्यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ सागवानी लाकडाचा रथ दिला. तर पुढच्यावर्षी पालखी सोहळयाला चांदीचा रथ असणार आहे.