कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रेचे दत्त जयंतीनिमित आयोजन
कोल्हापूर :
सालाबादाप्रमाणे मार्गशीर्ष व दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती पदयात्रेचे अध्यक्ष अमेंल कोरे यांनी दिली. प्रेस क्लब येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमवार दि.2 डिसेंबर प्रयाग चिखली येथील पंचगंगा नदी संगम येथील दत्त मंदिर येथे धार्मिक विधीसाठी पदयात्रेसाठी जमणार असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरे म्हणाले, पदयात्रेचे यंदाचे नववे वर्ष आहे. दरवर्षी यात्रेमध्ये नागरिकांचा कल वाढत आहे. मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी पदयात्रेचे कोल्हापुरातून प्रस्थान होणार आहे. शनिवार दि.14 रोजी यात्रा अक्कलकोट येथे पोहोचणार आहे. पदयात्रेमध्ये भजन, प्रवचन, सत्संग, मानसपुजा, सामुदायिक स्वामी चरित्र अध्याय वाचन,नामस्मरण,स्वामींचे अनुभव,पाद्यपूजा,रूद्रभिषेक,आरती आदी अध्यात्मिक सेवा कार्य होणार आहेत.
कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचा 300 किलोमीटरचा सलग 11 दिवस पायी प्रवास होणार आहे. यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सोमवार दि.2 डिसेंबर अंतिम मुदत असून नोंदणीसाठी व्हिनस कॉर्नर येथील घुणके हॉस्पिटल जवळील समर्थ फौंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी पंचगंगा नदी येथील दत्तमंदिरातून सायंकाळी 5 वाजता भव्य पालखी मिरवणुक निघणार आहे. मिरवणुकीत स्वामी समर्थ महाराजांची उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गंगावेस येथील श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या मठात पालखीचे स्वाग करण्यात येणार आहे. तेथून महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी संस्थापक रमेश चावरे, कार्याध्यक्ष सुहास पाटील, सचिव यशवंत चव्हाण, महिला अध्यक्षा वेणूताई सुतार आदी उपस्थित होते.