For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर-तिरूपती थेट विमानसेवा बंद !इंडिगो कंपनीचा धक्कादायक निर्णय

05:58 PM Nov 25, 2023 IST | Kalyani Amanagi
कोल्हापूर तिरूपती थेट विमानसेवा बंद  इंडिगो कंपनीचा धक्कादायक निर्णय
Advertisement

 15 डिसेंबरपासून व्हाया हैदराबाद सेवा : प्रवासाचा वेळ आणि तिकीट दर वाढणार : विमानप्रवाशांना दुहेरी दणका : संकेतस्थळावर बदलाची माहिती : विमानप्रवाशांतून तीव्र नाराजी

Advertisement

कोल्हापूर/संजीव खाडे

करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि तिरूपती बालाजी या दोन्ही देवस्थानला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक प्रवाशांत अत्यंत लोकप्रिय ठरलेली आणि मोठा प्रतिसाद लाभलेली कोल्हापूर-तिरूपती थेट विमानसेवा (नॉनस्टॉप फ्लाईट सर्व्हिस) इंडिगो कंपनीने बंद केली आहे. या सेवेऐवजी 15 डिसेंबरनंतर कोल्हापूर-तिरूपती व्हाया हैदराबाद अशी नवी सेवा सुरू करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. इंडिगोच्या वेबसाईटवर (संकेतस्थळावर) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, या निर्णयामुळे आता भाविक प्रवाशांना कोल्हापूरहून थेट तिरुपतीला जाता येणार नाही. नव्या सेवेनुसार तिरुपतीला जायचे असेल तर व्हाया हैदराबाद जावे लागणार आहे. यामध्ये तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागणार असून तिकीटासाठी तब्बल दोन ते सव्वादोनहजार रूपये जादा मोजावे लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याने प्रवशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोल्हापूरची अंबाबाई आणि तिरूपती यांच्या दर्शनाच्या निमित्ताने दोन्ही देवस्थानला दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, वेळेचे बचत व्हावी, या हेतूने कोल्हापूर-तिरूपती थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. 12 मे 2019 रोजी इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केली. सुरूवातीपासून या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला. कोरोनाच्या काळात ही सेवा राहिली. त्यानंतर 1 मे 2021 रोजी पुन्हा या सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही ही सेवा अखंडित सुरू होती. दररोजच्या फ्लाईटला प्रवाशी भाविकांचा व इतरांचा चांगला प्रतिसाद होता.

15 डिसेंबरपासून थेट सेवा बंद, व्हाया हैदराबाद सेवा सुरू

इंडिगो कंपनीच्या वेबसाईटवर ज्या ठिकाणी ऑनलाईन बुकींग होते, तेथे 14 डिसेंबरपर्यंत थेट विमानसेवेची माहिती मिळते. यामध्ये सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी विमान तिरुपतीला जाण्यासाठी उड्डाण करेल. त्यानंतर ते दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी तिरुपतीला पोहचेल. या नॉनस्टॉप फ्लाईटसाठी 1 तास दहा मिनिटांचा कालावधी लागेल. त्या दिवशीचा तिकीट दर 4241 रूपये असेल. एरव्ही तो 4051 रूपयांपर्यंत असतो. त्यानंतर 15 डिसेंबरच्या वेळापत्रकात कोल्हापूर-तिरूपती फ्लाईट वन स्टॉप व्हाया हैदराबाद असेल असे वेबसाईटवर स्पष्ट केले आहे. त्यामध्ये कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारे विमान दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करेल. त्यानंतर ते हैदराबादला जाईल. तेथून सायंकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी ते तिरुपतीला पोहचणार आहे. या नव्या सेवेनुसार जाण्याची येण्याची वेळ तर बदलली गेलीच आहे, पण त्याचा फटका भाविक, प्रवाशांना बसणार आहे. त्याचबरोबर पूर्वी एक तास 40 मिनिटात तिरुपतीला पोहचणारे भाविकांना आता 4 तास 45 मिनिटांचा प्रवास करावा लागणार आहे. यामध्ये पूर्वीपेक्षा 3 तास 5 मिनिटांचा जादा वेळ लागणार असल्याचा फटका असणार आहे. वेळेच्या फटक्याबरोबर आर्थिक फटकाही बसणार आहे. नव्या फ्लाईटने प्रवास करताना सहाहजार ते सव्वाहजार रूपये खर्च करावे लागणार आहेत. याआधीच्या थेट सेवेपेक्षा दोन ते सव्वादोनहजार जादा मोजावे लागणार असल्याने भाविक प्रवाशांचा आर्थिक भुर्दंड नाहक सहन करावा लागणार आहे.

कोल्हापूर विमानतळ अनभिज्ञ

दरम्यान, इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाची कोल्हापूर विमानतळ प्रशासनाला कोणत्याही प्रकारे कल्पना, माहिती देण्यात आलेली नाही. विमानतळ संचालक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदलाची इंडिगो कंपनीने विमानतळ प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे कल्पना दिली नसल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. ते म्हणाले, याबाबत आम्ही कंपनीला पत्र पाठविणार असून त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होती.

विमानप्रवाशातून नाराजी

कोल्हापूर-तिरूपती ही विमानसेवा सुरू करताना त्यामध्ये धार्मिक अस्थेचीही भावना होती. इंडिगो कंपनीने बदल करण्याचा निर्णय घेत असताना कोणतीही माहिती दिली नाही. तसेच धार्मिक अस्थेकडेही दुर्लक्ष केल्याची खंत काही प्रवाशांनी व्यक्त केली.

खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घ्यावा

कोल्हापुरातून विविध मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आणि यशस्वी राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा पूर्वीप्रमाणे थेट अर्थात नॉनस्टॉप सुरू करण्यासाठी तातडीने कंपनी आणि केंद्रसरकारच्या पातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, खासदार महाडिक परदेशात असून ते आज मायदेशात येणार आहेत. त्यांनी तातडीने हालचाली कराव्यात या मागणीने जोर धरला आहे.

Advertisement
Tags :

.