Kolhapur Breaking: पंचगंगा घाटावर भूत काढण्याचा आघोरी प्रकार, नागरिकांत भिती
रात्रीच्या वेळी घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरु
कोल्हापूर : सणांच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचगंगा नदी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. एका मांत्रिकाकडून महिलेच्या अंगातील भूत काढण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकडून भूत काढण्याचा आघोरी प्रकार सुरु असल्याचे दिसत आहे.
कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाटावरील हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कारण व्हिडीओमध्ये पंचगंगा नदी आणि घाट परिसर दिसत आहे. रात्रीच्या वेळी घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरु आहे. यामध्ये मांत्रिक हातवारे करुन महिलेला काहीतरी करण्यास भाग पाडत आहे. महिला त्याच्यासमोर पदर पसरुन मांत्रिक जो काही देईल ते घेताना दिसते. पंचगंगा घाटावर असा प्रकार घडल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
यावेळी घाट परिसरात अनेक लोक बसलेले दिसत आहेत. परंतु ते कुणीही याविषयी काही बोलताना दिसत नाहीत. नदी परिसर हा सायंकाळी किंवा रात्री फिरण्यासाठी सुंदर आणि शांत जागा आहे. परंतु अशा प्रकारांमुळे नागरिकांत भिती निर्माण होत आहे. त्यामुळे यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करुन हे प्रकार बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.