गळीत हंगामाने घेतली गती....161 लाख टन उसाचे झाले गाळप
कोल्हापूर : प्रतिनिधी
जिह्यातील गळीत हंगामाने आता गती घेतली आहे. एफआरपीचा मुद्दा आता निकाली निघाला आहे. अडचणी दूर झाल्याने मजुरांचे तांडे कारखानास्थळावर येत आहेत. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील सहकारी 19 आणि खासगी नऊ कारखान्यांची धुरांडी पेटली आहेत. कोल्हापूर विभागात 25.31 लाख टन उसाचे गाळप होऊन 21.94 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात 172 कारखान्यांनी 161.86 लाख टन उसाचे गाळप करुन 126.75 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.83 टक्के तर कोल्हापूर विभागाचे उतारा 8.67 टक्के आहे.
29 नोव्हेंबर अखेर राज्यात सहकारी 84 आणि खासगी 88 अशा 172 कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. मागील वर्षी याच दरम्यान 188 कारखान्यांनी 226.11 लाख टन उसाचे गाळप करुन 196.47 लाख क्विंटल साखर उत्पादित केली होती. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.69 टक्के होता यंदाच्या वर्षी उतारा सरासरी एक टक्क्याने घटला आहे.
कोल्हापूर विभागात 28 कारखान्यांनी एक लाख 64 हजार मे टन दैनिक क्षमतेने गाळप हंगाम सुरू केला आहे. पुणे विभागात 27 कारखान्यांनी 37.78 मे. टन, सोलापूर विभागात 42 कारखान्यांनी 37.7 मे. टन उसाचे गाळप झाले आहे. अहमदनगर विभागातील 23 कारखान्यांनी 22.82 लाख मे. टन, औरंगाबाद 22 कारखान्यांनी 16.69 लाख टन, नांदेड 28 कारखान्यांनी 20.82 लाख मे. टन, अमरावती विभागातील दोन कारखान्यांनी 1.73 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळपात राज्यात पुणे आणि सोलापूर विभाग आघाडीवर आहे. नागपूर विभागात एकाही साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालेला नाही.