Ratnagiri News : आरे-वारे समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू
11:23 AM Jun 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
एकास वाचविण्यात यश; कोल्हापुरातील क्लासच्या विद्यार्थ्यांची आली होती सहल
रत्नागिरी : तालुक्यातील आरे वारे समुद्रात समुद्रस्नानासाठी उत्तरलेल्या कोल्हापुरातील अतुल रघुनाथ सुतार (१७, रा. सावर्डे दुमाला, ता. करवीर जि. कोल्हापूर) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर मयुर विष्णू खाडे (१६, रा. सावर्डे, कोल्हापूर) याला वाचविण्यात यश आले. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
दोघेही कोल्हापूर येथील एमएससीआयटी क्लासचे विद्यार्थी आहेत. या क्लासकडून ४० विद्यार्थ्यांची गणपतीपुळे, आरे वारे अशी सहल काढली होती. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक देखील उपस्थित होते. मंगळवारी हे विद्यार्थी सकाळी ४ वाजता कोल्हापूर येथून रत्नागिरी गणपतीपुळेकडे रवाना झाले होते. गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन हे विद्यार्थी ३ वाजण्याच्या सुमारास आरे-वारे येथे समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी आले.
पाण्यात मौजमजा करत असताना यातील अतुल सुतार व मयुर खाडे हे खोल पाण्यात गेले. दोघेही लाटेसोबत खोल पाण्यात ओढले गेल्याने गटांगळ्या खावू लागले. दोघांची अवस्था पाहून समुद्रकिनारी असणाऱ्या मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आर्त किंचाळ्या ऐकून येथे असलेले ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील यांच्यासह झीप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी हे मदतीसाठी धावले.
बुडणाऱ्या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत अतुल सुतार याचा मृत्यू झाला होता. तर दुसरा विद्यार्थी मयुर खाडे याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयुर याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर्सनी सांगितले. या घटनेची माहिती मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना देण्यात आली असून त्याचे नातेवाईक रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते.
Advertisement
Advertisement
