For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dudha Katta Kolhapur: पोलीस अधिक्षकांनी घेतला दूध कट्ट्याचा अनुभव, गंगावेशमध्ये गवळ्यांबरोबर संवाद

06:15 PM Sep 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
dudha katta kolhapur  पोलीस अधिक्षकांनी घेतला दूध कट्ट्याचा अनुभव  गंगावेशमध्ये गवळ्यांबरोबर संवाद
Advertisement

पोलीस अधिक्षकांनी गंगावेश येथील दूधकट्ट्यावंर गवळी बांधवांशी संवाद साधला

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा, अंबाबाईच मंदिरं, रंकाळा समोर येतो. पण या सर्वांबरोबरच एक वेगळी ओळख शहराने जपली आहे ती येथील दूधकट्ट्यांनी. शनिवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गंगावेश येथील दूधकट्ट्यावंर गवळी बांधवांशी संवाद साधला.

शहरातील गंगावेश, मिरजकर तिकटी, बागल चौक परिसरात रात्री उशिरापर्यंत दूध कट्ट्यांवर मिळणार म्हशीचं दूध हा कोल्हापूरकरांचा जीव की प्राण. दूधकट्टा हे फक्त दूध मिळण्याचं ठिकाण नसून, शहराच्या संस्कृतीचा भाग झालं आहे. रात्री उशिरा मित्रमंडळींसोबत कट्ट्यावर उभं राहून दूध पिणं, गप्पा मारणं हा अनेकांचा रोजचा शिरस्ता आहे.

Advertisement

शनिवारी रात्री साडेअकरा वाजता गंगावेशजवळील कट्टा आवरण्याच्या तयारीत गवळी मंडळी होती. हातात बादली, बाजूला बांधलेली म्हैस आणि समोर असलेलं दूध. रोजचा व्याप संपवून घरी जाण्याची तयारी सुरू होती. इतक्यात चमचमत्या दिव्यांची व्हीआयपी गाडी येऊन थांबली. गवळी घाबरला.

अरे देवा, एवढ्या रात्री कोण साहेब आले? दूध संपलंय, वेळही संपलीय, आता काय करायचं? असे विचार त्याच्या मनात सुरू झाले. घाबरत तो म्हणाला, ‘साहेब, आता बंद करतो. दूध उरलं नाही. कट्टा आवरतोय. गाडीचं दार उघडलं आणि त्यातून जीन्स पॅन्ट आणि साधा शर्ट घातलेले अधिकारी बाहेर आले. नुसत्या साध्या पोशाखातून त्यांना कोण ओळखेल, चेहऱ्यावर हसू, डोळ्यांत कुतूहल.

गवळी पुन्हा म्हणाला ‘साहेब, दूध उरलं नाही. त्यावर अधिकारी शांतपणे म्हणाले ‘काही हरकत नाही. तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, मी फक्त पहायला आलो आहे. इतकं ऐकताच गवळ्याचा ताण हलका झाला. तेव्हा त्यांनी शांतपणे उभं राहून गवळी कसा मेहनत करून म्हैशीला खाऊ घालतो, दूध काढतो आणि नंतर कट्ट्यावर आलेल्या कोल्हापूरकरांना गरमागरम दूध देतो, हे ते पाहिले.

हळूहळू वातावरण बदललं. गवळीही निवांत झाला. मग सुरू झाला मनमोकळा संवाद. गवळी म्हणाला, ‘साहेब, रोज रात्री इतकं उशिरा लोक दूध प्यायला येतात. कितीही दमलो तरी कट्टा बंद करायची हिम्मत होत नाही. कोल्हापूरचं प्रेम आहे ना साहेब. हे ऐकून अधिकारी हसले.

त्या क्षणी कट्टा जणू एका मोठ्या संवादाच्या व्यासपीठात बदलला होता. हे अधिकारी दुसरे-तिसरे कोणी नसून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता होते. शहरातील कायदा-सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी सांभाळणारे अधिकारी, मात्र त्या रात्री सामान्य माणसाप्रमाणे कट्ट्यावर उभे होते.

गवळींच्या चेहऱ्यावर कुतुहल

अधिकाऱ्यांचा साधेपणा पाहून गवळींच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोठ्या पदावरील माणूस दैनंदिन कामाबद्दल तन्मयतेने विचारतोय, आपल्याशी थांबून बोलतोय, हा अनुभव गवळी मंडळींना पहिल्यांदाच आला. साहेब, एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा तुम्ही साधेपणाने आमच्यासोबत उभे आहात, हे आयुष्यभर लक्षात राहील, असे गवळी म्हणाला.

त्यांनी फक्त दूध कट्ट्याचा अनुभव घेतला, तर गवळी मंडळींच्या मेहनतीचं कौतुकही केलं. रात्रीच्या शांततेत घडलेला हा प्रसंग गवळी मंडळींसाठी अविस्मरणीय ठरला. धकाधकीत सामान्य माणसात मिसळलेला मोठ्या पदावरील अधिकारी पाहणं हीच खरी कोल्हापूरकरांसाठी मोठी गोष्ट ठरली.

Advertisement
Tags :

.