Kolhapur Police: बदली, प्रॉव्हिडंट फंड, मेडिकल बिलासाठी टक्केवारी, पोलिसांनाच द्यावा लागतो हप्ता
पानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दबक्या आवाजात चर्चा सुरु
By : आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ ब्रिदवाक्य घेवून जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांनाच त्यांच्या वैद्यकीय बिले, प्रॉव्हिडंट फंड, तसेच पेन्शनसाठी टक्केवारी द्यावी लागत आहे. वैद्यकीय बिले आणि पेन्शनसाठी 1 टक्का तर प्रॉव्हिडंट फंडासाठी 2 टक्के रक्कम काही कर्मचाऱ्यांकडून स्विकारली जात आहे. पानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही साखळी तोडून काढण्याची गरज आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील प्रमुख लिपीक संतोष मारुती पानकर, हेड कॉन्स्टेबल धनश्री जगताप या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संतोष पानकर याला शनिवारी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे पोलीस मुख्यालयातील लिपीक आणि इतर विभागातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारत राखीव बटालियनमध्ये लाचलुचपत विभागाने कारवाई करुन पोलीस अधीक्षकांसह सहा जणांना जेरबंद करण्यात आले होते.
तसेच 2025 मध्ये पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचारी लाच प्रकरणात जेरबंद झाले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची खाबूगिरी एकीकडे समोर येत असतानाच, आता पोलीस मुख्यालयातील लिपिकांची खाबूगिरीही उघड्यावर आली आहे.
दयाला कोणाचे अभय ?
जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या निधीमध्ये कमिशन घेतल्याचा ठपका पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागात काम करणाऱ्या दयावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्या दयावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र या प्रकरणातून सहीसलामत बाहेर आलेल्या दयाला कोणाचे अभय आहे. निलंबनाची कारवाई होवूनही त्याचा अहवाल कसा बदलण्यात आला, अशी चर्चा मुख्यालयात रंगली होती.
पानकरांकडे डब्बल चार्ज
संतोष पानकर यांच्याकडे सध्या दोन चार्ज आहेत. आस्थापना शाखेचे प्रमुख लिपीक याचसोबत कार्यालय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार पानकर यांच्याकडे आहे. यामुळे सध्या पानकरांकडे डब्बल चार्ज होता. यामुळे त्यांची डिमांड सध्या वाढली होती. पोलीस कर्मचाऱ्यांची प्रत्येक फाईल पानकरकडूनच जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कचाट्यात पकडण्यात येत होते.
आस्थापनेतून अकौटंटला मर्जीतील कर्मचारी
पानकर हे अकौटंट विभागात होते. यानंतर ते आस्थापना शाखेत आले. यावेळी पानकरांनी आपल्या मर्जीतील काही माणसे आस्थापना आणि अकौटंट विभागात भरती केली. यामुळे दोनही विभागातील सर्व फायली पानकर यांच्या हाताखालून जात होत्या. मुख्यालयातील अनिल, अभि आणि प्रदीप हे पानकरांचे मानकरी असल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. काही लिपीकांकडे अलिशान वाहने आणी मोबाईल आहेत. तर काही कर्मचारी आपली नोकरी सांभाळून हॉटेल व्यवसाय करत आहेत.
शहर पोलीस उपअधीक्षक करणार तपास
या प्रकरणाचा तपास हा शहर पोलीस उपअधिक्षक अजित टिके यांच्याकडे देण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (पिसी अॅक्ट) नुसार या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. हा तपास शहर पोलीस अधिक्षक अजित टिके हे करणार आहेत.