Kolhapur Sound System: पोलिसांची असहिष्णुता नव्हे सांस्कृतिक आरसा, धिंगाणा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल
कायद्याचा बडगा उगारल्याने पोलिसांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे
By : संतोष पाटील
कोल्हापूर : उत्सवाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला. हा त्यांचा दृष्टिकोन असहिष्णुतेचा आणि कारवाईपुरता मर्यादित नाही. समाजाला सण-उत्सवांची सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवत जबाबदारीने आनंद साजरा करण्याचा धडा देणारा आहे.
उत्सवाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारल्याने पोलिसांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. शिक्षा लहान परंतु गंभीर परिणामकारक गणेशोत्सव काळात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या सुमारे साडेचारशे तरुण मंडळ आणि डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत नोटिसा बजावल्या तर 69 जणांवर प्रत्यक्ष गुन्हे दाखल झाले.
सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवणारे कृत्य केल्याप्रकरणी लावलेली नव्या दंड संहितेनुसार शिक्षा कमी असली तरी ते गंभीर परिणाम करणारे आहेत. भारतीय दंड संहिता 2023 मधील कलम 223 आणि 285 नुसार पोलिसांनी तरुण मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्ते, टॅक्टर चालक, डीजे मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
जबाबदारीचे भान कधी येणार?
कोल्हापूर पोलिसांनी यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत दाखवलेली कारवाई हा फक्त त्या मंडळांवर नोंदवलेला गुन्हा नसून, सण-उत्सवांच्या बदलत्या सामाजिक वास्तवाचा आरसा आहे. परंपरेच्या नावाखाली वाढत गेलेली ध्वनीची उधळपट्टी आणि कायद्याचे वारंवार होणारे उल्लंघन यावर आता प्रशासनाने स्पष्ट मर्यादा आखल्या आहेत.
या कारवाईचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे सामाजिक संदेश. आजवर ‘सण म्हणजे आवाज“ अशी मानसिकता तयार झाली होती. पण या पोलीस कारवाईने आयोजक आणि समाजाला दाखवून दिले आहे की उत्सवाचा आनंद हा जबाबदारीनेच शक्य आहे.
कायदेशीर परिणाम
कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई केली असून, खालील कायदेशीर परिणाम मंडळांना आणि डीजे चालकांना भोगावे लागू शकतात. गुन्हा दाखल झाल्याने मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, डीजे चालक आणि ट्रॅक्टर चालकांचे नाव पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीत जाईल. हा क्रिमिनल रेकॉर्ड कायम राहील, ज्यामुळे भविष्यात नोकरी, व्हिसा किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो.
तपासानंतर पोलीस चार्जशीट कोर्टात दाखल करतील. यानंतर आरोपींना मजिस्ट्रेट कोर्टात हजर राहावे लागेल. खटला काही महिने ते वर्षभर चालू शकतो. वारंवार उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा (जास्त कारावास आणि दंड) आणि जप्ती तसेच परवानगी कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे.
आरोग्य आणि शांतता महत्वाची
सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय दोघांनीही वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, लाऊडस्पीकर किंवा डीजे हा धर्माचा अनिवार्य भाग नाही. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जपतानाही इतरांच्या आरोग्याचा आणि शांततेचा अधिकार अबाधित ठेवणे ही राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि पर्यावरणीय कायदे यामध्ये संतुलन साधणं अनिवार्य ठरतं.
गुह्यांच स्वरुप आणि कायदेशीर तरतुदी
कलम 223 (भारतीय न्याय संहिता 2023) : हे कलम सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांना लागू होते. गणेश मिरवणुकीत अत्यधिक आवाज, ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक शांततेचा भंग यामुळे मंडळांवर हे कलम लावले आहे. यात 3 ते 6 महिन्यांचा कारावास, एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. जामीनपात्र गुन्हा आहे, ज्यामुळे पोलिसांना एफआयर नोंदवण्याचा आणि तपासाचा अधिकार आहे.
कलम 285 : हे कलम : बेपर्वाईने कृत्य करणे, ज्यामुळे लोकांचे आरोग्य, जीवित किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होतो, अशा प्रकरणांना लागू आहे. मिरवणुकीत डीजे वाद्यांचा अतिरेक, ध्वनीमर्यादा उल्लंघन आणि वाहतुकीस अडथळा यामुळे हे कलम लागू झाले आहे. यात सहा महिन्यांपर्यंत कारावास, एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. हा देखील जामीनपात्र गुन्हा आहे.