कोल्हापुरात सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र व्हायला हवे
कोल्हापूर :
कोल्हापूर कला, क्रीडा, चित्रकार, दिग्दर्शक, अभिनेत्यांची भूमी आहे. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातही कोल्हापुरने 90 टक्के योगदान दिले आहे. कोल्हापुरातील सांस्कृतिक ठेव्याचा अभ्यास केल्याशिवाय संशोधन पूर्ण होत नाही. त्यामुळे कोल्हापुरात सांस्कृतिक पर्यटन केंद्र व्हायला हवे, असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक, अभिनेता ह्रषिकेश जोशी यांनी केले.
ब्राह्मण सभा करवीर व महालक्ष्मी को-ऑप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तात्यासाहेब तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प जोशी यांनी गुंफताना ते बोलत होते. ‘कलेची ऐतिहासिक पंढरी, कोल्हापूर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
जोशी म्हणाले, कोल्हापुरात कला, चित्रकला, शिल्पकला, नाटक, संगीत क्षेत्रात जागतिक दर्जाचे काम झाले आहे. स्थापत्यशास्त्रात कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराचा उल्लेख आहे. कोल्हापुरच्या मातीत सृजनाचा बिंदू असल्याने चित्रकलेचे कोल्हापुरला मोठे वरदान आहे. अबालाल रेहमान यांची चित्रकला पाहून मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेत सुवर्णपदक देण्याची परंपरा सुरू झाली. शाहू महाराज यांनी दरबारचे चित्रकार म्हणून त्यांची नियुक्ती करून दरमहा 25 रूपये आयुष्यभर वेतन दिले. अबालाल रेहमान गुजरीत राहात होते, परंतू त्यांचे घर कोणते हे कोणाराच माहीत नाही. शिवाय गुजरीतील रस्त्यालाही त्यांचे नाव देण्यात आलेले नाही, अशी खंतही जोशी यांनी व्यक्त केली.
1885 ते 1890 च्या दशकात बाबुराव पेंटर, संगीतसूर्य केशवराव भोसले, आनंदराव पेंटर, श्रीपतराव काकडे असे अनेक दिग्गज कोल्हापुरात जन्माला आले, असे सांगत या नावाजलेल्या महनीय कलाकारांचा जिवनपट उलगडला. तसेच त्यांच्या काळात त्यांनी मांडलेल्या संकल्पना पुढे त्यात्या क्षेत्रातील नियमावलीच कशा बनल्या हे उदाहरणासहीत स्पष्ट केले. तसेच कोल्हापूरचा ऐतिहासीक वारसा ठेवा नव्या पिढीने जपला पाहीजे. अन्य शहरांप्रमाणेच कोल्हापूच्या लहान मोठ्या गल्यांमध्ये दिग्गज कलाकार जन्मास आले होते. त्यांच्या वास्तू-स्मृती जपण्याचे काम सर्वांनी केले पाहीजे असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अॅङ राजेंद्र किंकर यांनी करून दिला. दीपक भगत यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत लिमये यांनी आभार मानले.
यावेळी जयंत तेंडूलकर, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर, अॅङ विवेक शुक्ल, प्रशांत कासार, केदार हसबनीस, सुहास तेंडूलकर, केदार तेंडुलकर, रामचंद्र टोपकर, सुधीर जोशी आदी उपस्थित होते.