Kolhapur Crime | कोल्हापूर हादरले! कनाननगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; घरांवर सशस्त्र हल्ला आणि वाहनांची तोडफोड
कनाननगरमध्ये तरुणावर चाकू हल्ला, परिसरात दहशत
कोल्हापूर -पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणाच्या घरासह अन्य दोन घरांवर सशस्त्र हल्ला करत वाहनांची तोडफोड केली. यामध्ये अनिकेत विनोद कांबळे (कनाननगर) याच्यावर टोळक्याने चाकू हल्ला करत जखमी केले. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कनाननगर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नऊ जणांबर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मनिषा विनोद कांबळे (वय ३२ रा. सावंत गल्ली, कनाननगर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
यानुसार वृषभ गायकवाड, अनिकेत शिंदे, अजय चव्हाण, गणेश उर्फ संदेश घोलप, रोहित एराळे, मलिक कांबळे, अनुराग शिंदे, ओंकार पाटील, हर्षद संकपाळ (सर्व रा. कनाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मनिषा कांबळे पती, मुलगा अनिकेतव रियांश यांच्यासोबत कनाननगर येथे राहतात. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या गौरव भालेराव याचा अजय चव्हाण, अनिकेत शिंदे यांच्या सोबत दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. दारुसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरुन गौरवला या दोघांनीमारहाण केली होती.
या प्रकरणी गौरवने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरुन शुक्रवारी रात्री संशयितांनी गौरव भालेरावच्या घरावर हल्ला चढविला. हातामध्ये तलवारी, एडका घेऊन घराच्यादरवाजाची तोडफोड करण्यात आली. तसेच घरातील प्रापंचिक साहित्यासह दुचाकीचीही तोडफोड केली.याचदरम्यान ही घटना पाहून घाबरलेला अनिकेत कांबळे हा घरी पळून जात होता. संशयितांनी अनिकेतला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. वृषभ गायकवाड याने अनिकेतच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला, मात्र अनिकेतने तो बार चुकविला. मात्र वृषभने अनिकेतच्या पाठीवर चाकूने वार केला. मनिषा कांबळे यांनी अनिकेतला हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करुन घेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.
पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही
गौरव भालेराव याने मारहाणीची तक्रार दोन दिवसांपूर्वीच शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. यामुळे हल्लेखोरांनी दहशत माजविण्यासाठी हा हल्ला केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच दोघा हल्लेखोरांवर कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता.
तीन घरांसह, दुचाकीचे नुकसान
हल्लेखोरांनी गौरव भालेराव याच्या घरासह परिसरातील अन्य दोन घरांची नासधूस केली. यामध्ये घराचा दरवाजा, घरातील प्रापंचिक साहित्य, परिसरातील दुचाकीची तोडफोड केली. घटनास्थळी वीट, दगड आणी तलवारीची विट पडली होती. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.