स्कूल बस पलटी होता होता वाचली ! २५ ते ३० मुलांचे प्राण वाचले; वळीवडे येथील घटना
उचगाव/ वार्ताहर
वळीवडे (ता. करवीर) येथील संत कँवरराम कॉलनी, व्हीआरएल ट्रान्सपोर्टच्या मागील रस्त्यावर मुलांना शाळेला घेऊन जाणारी एका खासगी शाळेची स्कूलबस रस्त्याकडेला असलेल्या गटारीत गेल्याने पलटी होता होता वाचली. या बसमधील सुमारे २५ ते ३० मुलांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, वळीवडे आणि गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना घेऊन एका खासगी शाळेची स्कूलबस संत कँवरराम कॉलनी येथून जात होती. कॉलनीतील रस्ता अरुंद असून ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा मोठी गटार काढली आहे. तसेच पावसामुळे ही गटर खचली आहे. असे असतानाही स्कूल बसच्या ड्रायव्हरने मुलांचा जीव धोक्यात घालून या रस्त्याने स्कूल बस नेण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस गटारीत घुसली. आणि पलटी होता होता वाचली. त्यावेळेस बस मधील शाळेच्या मुलांनी आरडा ओरडा केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे मुले घाबरून गेली. केवळ दैव बलवत्तर म्हणून बस गटारीत पलटी झाली नाही. काही वेळातच तेथील स्थानिक नागरिकांनी बसकडे धाव घेत बस मधील लहान मुलांना बाहेर काढले. मुले घाबरून रडत होती. ही घटना वाऱ्यासारखी गांधीनगर वळीवडेत पसरली. मुलांचे पालक घटनास्थळी आले. घाबरलेल्या मुलांना धीर देत काही मुलांना घरी घेऊन गेले. काहींची दप्तरे बस मध्येच राहिली. यावेळी भारतीय सिंधू सभेचे गांधीनगर उपाध्यक्ष हिरा परमानंदानी, गिरधारी कारडा, राजेश कारडा, रामलाल सेवलानी, श्याम बिजलानी, सनी करडा, विजय डेंबानी यांनी या मुलांना सुखरूप बस मधून बाहेर काढले. आणि मुलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शाळेमधील व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बस काढण्यासाठी क्रेनला पाचरण केले. आणि गटारीत रुतलेली बस क्रेनच्या साह्याने बाहेर काढली.
अतिक्रमणामुळे वाद
संत कँवरराम कॉलनीतील मूळरस्ता ३६ फुटी आहे. अतिक्रमणामुळे वाद झाल्याने डांबरीकरण १० फुटाचे झाले आहे. दुतर्फा गटारीचे बांधकाम न झाल्यामुळे गटारीचे क्षेत्र वाढून रस्ता कमी झाला आहे त्यामुळे असे अपघात होत आहेत. याच रस्त्यावर पूर्वीही दोन डंपर, एक व्हॅन गटारात घुसली होती. त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे.