For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेतवडेतील आदर्श शाळा बांधकामाची होणार चौकशी!सीईओंकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत; 'तरुण भारत संवाद'च्या वृत्ताची गंभीर दखल

10:04 PM Apr 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
वेतवडेतील आदर्श शाळा बांधकामाची होणार चौकशी सीईओंकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत   तरुण भारत संवाद च्या वृत्ताची गंभीर दखल
Advertisement

१५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश; वादग्रस्त ठेकेदाराकडून बांधकाम मात्र सुरुच; चौकशी होईपर्यंत बांधकाम स्थगित करण्याची ग्रामस्थांची मागणी

Advertisement

कृष्णात चौगले कोल्हापूर

आदर्श शाळा विकसित करण्याच्या योजनेतून पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर बेतवडे शाळेसाठी १ कोटी ७ लाख ९७ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. पण मंजूर निधीतून शाळेचे बांधकाम सुरु केलेले नाही. तरीही प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित ठेकेदारास तब्बल २८ लाख ९२ हजार १५५ रूपयांचे बिल अदा केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत 'तरुण भारत संवाद'च्या प्रस्तुत प तिनिधींनी १५ एप्रिल रोजी वेतवडेतील आदर्श शाळेच्या बांधकामात 'गोलमाल' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. सीईओ कार्तिकेयन एस यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. चौकशी करून त्याबाबतचा अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश सीईओ कार्तिकयन यांनी दिले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

चौकशी समितीमध्ये पन्हाळा पंचायत समितीकडील उपअभियंता (बांधकाम) व्ही.एस.तराळ, जि.प. वित्त विभागाचे लेखाधिकारी के. एल. पाटील, प -. उपशिक्षणाधिकारी बी.डी.टोणपे या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आदेशामध्ये वेतवडेतील शाळेचे बांधकाम इस्टीमेटनुसार झालेले नसून संबंधित ठेकेदाराने बोगस कागदपत्रे बनवून शाळा इमारतीच्या पहिल्या टप्यातील बील अदा करून घेतले आहे. या अनियमिततेबाबत चौकशी करावी असे निर्देश चौकशी
समिती सदस्यांना दिले आहेत.

'आदर्श शाळा विकसित करणे' या योजनेतून बेतवडे येथे प्राथमिक शाळेची दुमजली इमारत बांधली जाणार आहे. कार्यारंभ आदेश झाला असला तरी शाळेचे कोणतेही बांधकाम केलेले नाही. तरीही फुटींग स्टील, कॉलम स्टिल बांधणीसह अन्य फोटो जोडून शिक्षण विभागाकडून तब्बल २८ लाख ९२ हजारांचे बिल ठेकेदाराने उचलले आहे. बिल मंजूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बांधकामाच्या ठिकाणचे जिओ टैगिंगद्वारे घेतलेले फोटो जोडणे आवश्यक होते. पण ठेकेदाराने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये केवळ जागेचा फोटो जिओ टॅगिंगचा जोडला आहे. उर्वरित बांधकामासाठी काढलेले खड्डे तसेच बांधकामाच्या साहित्याचे फोटो जिओ टॅगिंगचे नसल्यामुळे ते 'मॅनेज' केले असल्याचे स्पष्ट होते, वास्तविक बांधकामाच्या ठिकाणी कॉलम काढण्यासाठी कोणतेही खड्डेही काढलेले नसताना त्याचे फोटो बील मंजुरीच्या प्रस्तावाला जोडले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी केल्यास या कामात कशा प्रकारे अनियमितता झाली आहे, तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने जि.प. प्रशासनाची कशी फसवणूक केली आहे याची वस्तूस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.

तरीही शाळेचे बांधकाम सुरुच

'तरूण भारत संवाद'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर सीईओ कार्तिकेयन एस यांनी चौकशी समिती नियुक्त केली असली तरी संबंधित वादग्रस्त ठेकेदाराने शाळेचे बांधकाम गतीने करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी बहुतांशी साहित्य गडबडीने बांधकामाच्च्या ठिकाणी आणले आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली असून त्यांच्याकडून पुढील आदेश येईपर्यंत बांधकाम स्थगित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी बांधकाम ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ठेकेदारांच्या प्रतिनिधींकडे केली. तरीही बांयकाम सुरुच ठेवले आहे.

बारा तालुक्यांतील आदर्श शाळा बांधकामाची चौकशी आवश्यक

पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील आदर्श शाळेच्या बांधकामाच्या कामांत ज्या पद्धतीने गोलमाल झाला आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील आदर्श शाळांच्या बांधकामापूर्वीच प्राथमिक टप्प्यातील बिल अदा केले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व तालुक्यातीलU आदर्श शाळा बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे जि.प. प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे,

Advertisement

.