Kolhapur News | कोल्हापूरकरांनो सावधान! काळम्मावाडीतील पाणीसाठा घटला, पाणी जपून वापरा
कोल्हापूर -काळम्मावाडी धरणतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे आणि मान्सून लांबण्याची शक्यता असल्यामुळे शहरवासियांना यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरणातील थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा पाण्याची पातळी घटल्यामुळेसध्या बंद झाला असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा,असे असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अल् निनोच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा सध्या बंद झाला आहे. परिणामी, या योजनेतून शहराला पाणीपुरवठा होणार नाही.शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आगामी काळातील पावसाची शक्यता तसेच नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे.
त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.