कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील साईट पट्ट्या वाहून गेल्या! खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक
प्रयाग चिखली वार्ताहर
पुराच्या पाण्याने साईड पट्ट्या वाहून गेल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पूल ते केर्ले गावापर्यंतचा प्रवास धोकादायक बनला आहे. तातडीने रस्त्याच्या साईड पट्ट्या दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे.
पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शिवाजी पूल ते केर्ले गावादरम्यान महामार्गावर साधारण तीन फूट पाणी पसरले होते. पुराचे पाणी वाहते होते शिवाय पाणी तीन दिवस रस्त्यावर असल्यामुळे रस्ता तसेच रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर मोठे खड्डे पडले आहेत या ठिकाणच्या साईट पट्ट्या वाहून जाऊन दुरावस्था झाली आहे.
महामार्ग विभागाकडून दोन महिन्यापूर्वी महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्यां भक्कम भरून घेणे अपेक्षित असताना अक्षरश:खंर- माती टाकून तकलादू पणे साईट पट्ट्या गुळगुळीत केल्या होत्या. पाऊस लागल्यावर या साईट पट्ट्या निसरड्या बनल्या होत्या त्याचा प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता. त्याबाबत वाहनधारकांनी संताप व्यक्तही केला होता. अत्यंत निकृष्ट पद्धतीने भरलेल्या या साईड पट्ट्या पुराच्या पाण्यामुळे वाहून जाऊन साईट पट्ट्यांवर दोन ते चार फुटापर्यंत खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना या खड्ड्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अत्यंत तातडीने या साईड पट्ट्या केल्या नाहीत तर प्रवाशांच्या जीवास धोका पोहोचू शकतो. प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्याची दुरावस्था पुरामुळे अधिकच वाढली आहे. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी रस्ता खचला आहे पाणी अजूनही रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे वाहनधारकांनी खबरदारी घेणे त्यांचे गरजेचे आहे