Cultural Kolhapur: कोल्हापुरातील राणीची बाग झाली चिमासाहेबांची बाग कशी झाली?
या विवाह सोहळ्यासाठी ब्रिटिश अधिकारी कोल्हापुरात आले होते
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : सीपीआर हॉस्पिटलच्या चौकात कोर्टाच्या भिंतीला लागून डाव्या हाताला एक छोटीशी बाग आहे. त्यात 1857 च्या बंडात ब्रिटिशांच्या विरोधात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आपल्या चिमासाहेब महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्यामुळे या बागेचे नाव चिमासाहेब उद्यान आहे.
चौकाचेही नाव तेच आहे. पण कोल्हापूरकरांना सीपीआर चौक, अशीच ओळख अधिक आहे. बागेत एक सुंदर बांधणीचा दगडी गोलाकार कारंजा आहे. सध्या तो बंद आहे. या बागेत कमी, पण बागेच्याकडेने एवढी झाडी वाढली आहे की त्यात ही बाग व चिमासाहेब महाराजांचा पुतळाच दडून गेला आहे.
मार्च 1908 या दिवशी म्हणजे 117 वर्षांपूर्वी या बागेत कारंजा लगत राणी व्हिक्टोरिया यांचा संगमरवरी पुतळा मेघडंबरीसह बसवण्यात आला आणि याच दिवशी या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब यांचा विवाह या दिवशी भवानी मंडपात देवाच्या तुकोजीराव पवार महाराज यांच्याशी झाला.
या विवाह सोहळ्यासाठी ब्रिटिश अधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यापैकी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या हस्ते या राणी व्हिक्टोरिया यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आणि या बागेचे नामकरणसुद्धा ‘प्रिन्सेस गार्डन’ असे करण्यात आले.
त्यानंतर या बागेत सातवे एडवर्ड, महाराणी अलेकझांड्रीया, कर्नल ड्युक, डचेस कॅनॉट यांचेसुद्धा पुतळे बसवण्यात आले. या सर्व पुतळ्यांच्या उभारणीमुळे कोल्हापूरकर या बागेला पुतळ्यांची बाग म्हणून ओळखू लागले. या बागेसमोर आता जेथे करवीर पंचायत समिती आहे तेथे पॉवर हाऊस होते. डिझेल यंत्रावर तेथे वीज निर्मिती करण्यात येत होती. ही वीज जुना राजवाडा, ताराबाई पार्कातील काही निवासस्थाने (रेसिडेन्सी) येथे जात होती.
कोल्हापूर शहरात पूर्ण क्षमतेने रात्री वीज पुरवठा केला जात नव्हता. रॉकेल वरचे दिवे चौकाचौकात खांबावर लावण्यात आले होते. या बागेतील संगमरवरी पुतळे, शोभेची झाडे, कारंजाचे तुषार यामुळे हा चौक सुंदर दिसत होता. पण स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांना मात्र हा चौक पारतंत्र्याचे प्रतीक म्हणून सतत टोचत होता किंवा ही बाग पारतंत्र्याची भावना अधिक तीव्रतेने जाणवून देत होती.
1914 साली एके दिवशी या भावनेचा उद्रेक झाला व या पुतळ्यावर स्वातंत्र्यसैनिकांनी डांबर ओतून येथील पुतळे विद्रूप केले. या घटनेनंतर राणी व्हिक्टोरिया यांचा पुतळा वगळता अन्य पुतळे या बागेतून हलवण्यात आले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व्हिक्टोरिया राणीचा पुतळाही काढण्यात आला. त्यानंतर या बागेत चिमासाहेब महाराजांचा अर्धपुतळा बसवण्यात आला. आणि चौकाचे नाव चिमासाहेब चौक असे करण्यात आले.