जिल्ह्यात पावसाची रिपरिप राजाराम बंधाऱ्यावर 22 फूट 5 इंच पाणी पातळी
जिल्ह्यात दोन दिवसापासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.राधानगरी धरणातून 2 हजार 928 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात दीड फूटाने वाढ झाली असून राजाराम बंधाऱ्यावर बुधवारी रात्री 22 फूट 5 इंच इतकी झाली होती.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती.पंधरा दिवसानंतर पुन्हा पाऊस परतला.यामुळे पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली होती.यामुळे 35 फूटापर्यंत पाणीपातळी गेली होती.त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली.मात्र दोन दिवसापासून पुन्हा उघडझाप सुरु झाली आहे.अधूनमधून मोठया सरी कोसळत आहेत.काहीवेळ ऊन पडून पुन्हा मोठी सर येत असून ऊन पावसाचा खेळ सुरु आहे.
राधानगरी धरणातून 2 हजार 928 क्युसेक्स इतका विसर्ग सुरु असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.रात्री राजाराम बंधाऱ्यावर 22 फूट 5 इंच इतकी पाणीपातळी होती.
पाण्याखालील बंधारे
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील- चंदगड, भोगावती नदीवरील- खडक कोगे, दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सिध्दनेर्ली व बाचणी, वारणा नदीवरील - चिंचोली, हिरण्यकेशी नदीवरील- ऐनापूर व साळगाव असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत.