Kolhapur Rain Update: पहिल्याच पावसात पंचगंगा पात्राबाहेर, धरण क्षेत्रात संततधार सुरुच
राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात पावसाची जोरदार रिपरिप सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट 6 इंचावर पोहोचली आहे असून नदी पात्राबाहेर पडली आहे. राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
यंदा पहिल्याच पावसात पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणीपातळी देखील वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा पाणीसाठा असल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू सुरु आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात ५ फूट ५ इंचाची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून अद्यापही विसर्ग सुरूच आहे. मागील वर्षी याच दिवशी राधानगरी धरणात 27 टक्के पाणीसाठा होता तर आज राधानगरी धरण 63 टक्के पाणीसाठा आहे.
राधानगरी धरणातून पाण्याचा प्रतिसेकंद 3100 क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. तर दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात झालेला पाऊस
राधानगरी धरण- १३९ मिलिमीटर
तुळशी धरण- १४४ मिलिमीटर
दूधगंगा धरण- १५१ मिलिमीटर
पाटगाव धरण- १९५ मिलिमीटर
घटप्रभा ल.पा.- २०५ मिलिमीटर
सर्फनाला ल. पा.- २०४ मिलिमीटर