For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Round Table Kolhapur Road: रस्त्यांखाली दडलंय काय? काय सांगतात कोल्हापूरचे अधिकारी?

02:08 PM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
round table kolhapur road  रस्त्यांखाली दडलंय काय  काय सांगतात कोल्हापूरचे अधिकारी
Advertisement

रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी 1 ते 3 वर्षापर्यंत संबंधित ठेकेदारावर असते

Advertisement

कोल्हापूर : दरवर्षी कोट्यावधी खर्च करुनही रस्त्यांतील खड्डे कायम आहेत. त्यासाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणा काय करत आहेत? या रस्त्यांखाली दडलंय काय?, या सर्वांची चर्चा मंगळवारी ‘तरुण भारत संवाद’ने घडवून आणली. या‘राऊंड टेबल’मध्ये अधिकारी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला.

महापालिका, जिल्हा परिषद आणि पीडब्ल्युडी शहर आणि ग्रामीण भागातील दरवर्षी शेकडो किलामीटरच्या रस्त्यांची दुरूस्ती, देखभालीसाठी वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करतात. या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी 1 ते 3 वर्षापर्यंत संबंधित ठेकेदारावर असते.

Advertisement

पीडब्ल्युडी केलेल्या कामाचे सर्वेक्षण करुन नेमके किती खड्डे रस्त्यात पडले, त्याची कारणे काय? याचा अहवाल करुन जबाबदार घटकांकडून त्याची दुरुस्ती करते. शहरात पाण्याचा निचरा नसल्याने रस्ते लवकर खराब होतात, खराब रस्त्यासाठी ठेकेदारावर कठोर कारवाई होत असल्याचे महापालिकेचं म्हणणं आहे.

जिल्हा परिषदेला देखभालीचा स्वतंत्र निधीच मिळत नाही, कामाचा दर्जा राखणे अपरिहार्य ठरत असल्याचे समोर आले. चर्चासत्रात शहर वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, मनपाचे शहर अभियंता रमेश मस्कर, पीडब्ल्युडीचे उपअभियंता महेश कांजर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राहुल माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी पाटील, महापालिका उपशहर अभियंता महादेव फुलारी, सिव्हील इंजिनिअर चंद्रकांत कांडेकरी, रिक्षाचालक मदन रेडेकर सहभागी झाले.

सर्व विभागांनी रेक्टिफिकेशन केले पाहिजे

रस्त्यावर खोदाईच्या कामामुळे पाडलेले खड्डे तसेच राहतात, त्याचा परिणाम टॅफिक जाम होण्यात होतो. अमृत योजना, वीज विभाग पाणीपुरवठा, विभाग यांच्यात समन्वय असला पाहिजे. त्यांनी या कामाचे रेक्टिफिकेशन केले पाहिजे. नागरिक आणि शासनाच्या प्रत्येक विभागाने समन्वयाने काम केले पाहिजे.

मानदुखीचा सर्वाधिक धोका वाढला आहे. स्पॉडीलेसीसच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. वाहनचालकांना बसणाऱ्या सततच्या धक्क्यांमुळे अनेक नागरिकांना मानदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अस्थिरोगतज्ञांकडे रुग्ण संख्या वाढली आहे.

एमआरआय’साठी गर्दी होत आहे. खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. त्यासाठी एमआरआय तपासणी करावी लागते. शहरातील एमआरआय सेंटरची चांगलीच चलती आहे. खड्ड्यांमुळे मणक्यांचा त्रास सुरु होतो. अनेकांना मणक्यांचा त्रास होऊन खिशाला आर्थिक चाट लागत आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे.

कंबरेची गादी सरकून कंबरदुखी होते. खड्ड्यांमुळे वाहनांची असमतोलता राहते. याचा परिणाम बसण्याच्या पद्धतीमुळे कमरेवर होताना दिसतो. कंबरदुखीचे रुग्णही वाढले आहेत. माकडहाड सरकल्यास पाठदुखी खड्ड्यांतील धक्क्यांमुळे अनेक वाहनचालकांचे माकडहाड सरकून पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.

डोळ्यांच्या समस्या वाढल्या वाढल्या आहेत. रस्त्यांवरून प्रवास करताना उडणारी धूळ नागरिकांच्या डोळ्यात जात आहे. यामुळे अनेकांना डोळ्यांचे त्रास होऊ लागले आहेत. डोळ्यांच्या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्यास कायमचे अंधत्व येण्याचा धोकाही असल्याचे अनेक नेत्रतज्ञांचे मत आहे.

  • सब ग्रेड : रस्त्यात सर्वात खाली मुरुमाचा थर तयार केला जातो.
  • सब बेस - मुरुमाच्या थरावर पाण्याचा निचरा करणाऱ्या खडीचा थर टाकला जातो.
  • बेस कोर्स - पाण्याच्या निचरा करणाऱ्या खडीच्या थरावर रस्त्याला ताकद देण्यासाठी पुन्हा खडीचा थर टाकला जातो.
  • वेअरिंग लेअर - मुरुम आणि दोन खडीच्या थरानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जाते.

वर्षात 84 हजार नव्या गाड्या

"प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आकडेवारीनुसार कोल्हापुरात गतवर्षी 11 लाख 60 हजार 155 वाहने होती. यावर्षी ती संख्या 12 लाख 44 हजारावर गेली. 84 हजार 622 वाहनांची त्यात नव्याने भर पडली. यामध्ये 9 लाख 81 हजार 185 दुचाकी आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाल्याने रस्त्यांवर ताण वाढत आहे. यातच रस्त्यातील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत."

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=vHcmzcb6jmY[/embedyt]

वाहनांच्या तक्रारी वाढल्या

"खराब रस्त्यामुळे सध्या दुचाकी गाड्यांचे सस्पेन्शन खराब होण्याचे प्रमाण आहे. चारचाकी वाहनांमध्ये खराब रस्त्यामुळे ऑईल चेंबर फुटणे, पेट्रोल पाईप फुटणे, बंपरला मार बसून खराब होणे अशा तक्रारी वाढत आहेत. सध्या दुरुस्तीसाठी येत असलेली बहुतांश वाहने खराब रस्त्यामुळे नादुरुस्त झाली आहेत. रस्ते चांगले नसल्यामुळे वाहनांच्या सस्पेन्शनची तक्रार समोर येत आहे."

पाईपलाईनचे सेन्सिंग होणे गरजेचे

"शहरात अमृत योजनेतंर्गत टाकलेल्या पाईपलाईनचे सेन्सिंग होणे गरजेचे आहे. सेन्सिंग यंत्रणेमुळे पाईपलाईनला कुठे गळती लागली आहे, हे तत्काळ लक्षात येते. मात्र महापालिकेकडे सेन्सिंग यंत्रणा नसल्याने पाईपलाईनला लागलेली गळती शोधावी लागते. यासाठीही रस्त्यांची खुदाई करावी लागत असून रस्ते खराब होत आहेत. सेन्सिंग यंत्रणा उपलब्ध झाल्यास अचूकपणे गळतीची माहिती मिळणार असून तेवढ्याच भागात खोदाई होईल, त्यामुळे रस्ते खराब होणार नाहीत."

शहराभोवती रिंगरोडचे जाळे पूर्ण होणे गरजेचे

"अवजड वाहनांसाठी शहराभोवती रिंगरोड करणे प्रस्तावित आहे. मात्र रिंगरोडचे काम अद्याप सुरु नाही. रिंगरोड झाल्यास शहरातून होणारी अवजड वाहतूक पूर्णत: रिंगरोडवरुन होईल. त्यामुळे शहरातील रस्तेही सुस्थितीत राहतील. यासाठी शहराभोवती रिंगरोडचे जाळे पूर्ण होणे गरजेचे आहे. गळती काढण्यासाठी वारंवार खोदाईची कामे सुरु आहेत. ज्या विभागाकडून रस्त्यांची खोदाई केली जाते. त्याच्यांकडून अन्य विभागांना याबाबत माहिती दिली जात नाही. रस्ते खोदाई करताना विभागांत समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी खोदाई करताना अन्य विभागांच्या सूचना असतील तर त्यावर विचार करणे शक्य आहे."

- रमेश मस्कर, शहर अभियंता,  महापालिका, कोल्हापूर

उपलब्ध निधीत रस्ते दर्जेदार होत नाहीत

"शहरात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. रस्ते खराब झाले की, त्याचे पॅचवर्क केले जाते. वारंवार पॅचवर्क होत आहे. पण रस्ते नव्याने करण्यात निधीची अडचण असते. एखादा रस्ता दर्जेदार करायचा म्हटलं तर त्यासाठी मंजूर निधी कमी असतो. फुलेवाडी रिंगरोड तीन राज्य मार्गांना जोडणार आहे. तो राधानगरी, गगनबावडा आणि गारगोटी या राज्यमार्गाला जोडतो. त्याही रस्त्याला निधी कमी पडल्याने रस्ता दर्जेदार होत नाही. रस्ते जास्तीत जास्त पाण्यामुळेच खराब होतात. वारंवार पॅचवर्कने त्या रस्त्याची अवस्था बिकट होते. पण चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न आहे."

- महादेव फुलारी, उपशहर अभियंता, महानगरपालिका, कोल्हापूर

फूटपाथवरील अतिक्रमणे हटवणे आवश्यक

"रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. खड्ड्यांतून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघातांत वाढ होत आहे. शहरातील बहुतांशी सिग्नलसमोरच खड्डे पडले आहेत. त्यामुळे सिग्नल सुटल्यानंतर वाहनधारकांना खड्ड्यांतूनच जावे लागत आहे, परिणामी सिग्नलजवळ ट्रॅफीक जामच्या घटना वाढल्या आहेत. 30 सेकंदामध्ये पूर्वी जिथे 50 वाहने जात होती, ती संख्या आता 25 ते 30 वाहनांपर्यंत आली आहे. त्यामुळे सिग्नलच्या परिसरातील खड्डे तात्काळ भरणे गरजेचे आहे. वाढलेली वाहनांची संख्या, येणारे पर्यटक या तुलनेत रस्त्यांची संख्या मर्यादित आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढून मास्टर प्लॅन आखून रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. शहरातील रस्ते आणि फूटपाथवर झालेली अतिक्रमणे खुली करणे आवश्यक आहे."

- नंदकुमार मोरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

पाणी निचरा न होणे, खोदाईमुळे रस्ते खराब

"रस्ते खराब होणे आणि रस्त्यांत खड्डे पडण्याचे प्रमाण विशेषत: नागरी भागात अधिक आहे. कारण गटार, रस्त्याचे नियोजन नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. गटारीला स्लोप नसतो. तिथले पाणी गटारीतून वाहून न जाता रस्त्यावर येते. ग्रामीण भागात ओढे, नाले अरुंद होत आहेत. त्यामुळे त्यातील पाणी रस्त्यावर येऊन रस्ते खराब होत आहेत खड्डे पडत आहेत. पाईपलाईन लिकेज, युटिलिटी कामासाठी केलेल्या खोदाईमुळेही रस्ते खराब होतात."

- महेश कांजर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर

रस्त्यावर पाणी आले नाही तर रस्ता सुरक्षित

"ग्रामीण भागातील रस्ते लवकर खराब होण्याचे कारण म्हणजे शेतातील चिखल, चिखल आणि वैरणीचा कचरा थेट गटारात मिसळल्यामुळे गटारे तुंबतात. तुंबलेले पाणी रस्त्यावर आले की रस्ता खराब होतो. त्याच्या देखभालीसाठी विशेष तरतूद नसते. रस्ते चांगले राहण्यासाठी पाण्याचा मार्ग सुरळीत गेला पाहिजे. चंदगड तालुक्यात 10 धनगरवाडे आहेत. तेथे रस्त्यासाठी परवानगी नाही. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण मार्ग 5500 किलोमीटर लांबीचा असतो. यामध्ये 3500 डांबरी तर 2 हजार किलोमीटर मार्गावर खडीकरण केले जाते. ग्रामीण भागात 9 मीटर तर जिल्हा मार्गात 12 मीटर साईडपट्टीचे रस्ते केले जातात."

-राहूल माळी, उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कोल्हापूर.

मणक्यांच्या आजाराचे रूग्ण वाढत आहेत

"रस्त्यातील खड्ड्यांमुळे हाडांसंबधित आजारांना आमंत्रण मिळत आहे. शक्यतो दुचाकी चालवणाऱ्यांना याचा त्रास अधिक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहनाचे चाक खड्ड्यात आदळल्याने पाठीच्या मणक्याला इजा होण्याचा धोका वाढत आहे. वाहने घसरून जखमी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सुमारे 300 हून अधिक रूग्ण हाडांसबंधीत आजारावर उपचारास आले आहेत. दुचाकी चालवताना गाडीचे चाक खड्ड्यात आदळणार नाही, याची दक्षता घ्यावी."

- डॉ. संभाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी, सेवा रूग्णालय, कसबा बावडा

खड्डे चुकवताना होते रिक्षाचालकांची कसरत

"शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीधारक खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना बरेच अपघात झाले आहेत. रिक्षाचालकांना तर सिग्नलसह विविध मार्गावरील प्रवाशी वाहतूक करताना खड्ड्यांतून सावधपणे रिक्षा चालवावी लागते. खड्ड्यांमुळे चालकांच्या खांद्याला सतत हादरे बसत असतात. काही चालकांना मणक्याचे विकार झाले आहेत. रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरसंसार, मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे अक्षरश: कठीण जात आहे. जसा रिक्षाचालकांचा प्रश्न आहे. तसाच दुचाकीचालकांचा प्रश्न आहे. तेव्हा महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यावर भर देणे गरजेचे आहे."

- मदन रेडेकर, रिक्षा चालक, कोल्हापूर

ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करा

"डांबरीकरण केलेला रस्ता किमान काही वर्षे टिकला पाहिजे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे रस्ते काम दर्जेदार करण्याची नैतिकता ठेकेदाराने पाळलीच पाहिजे. शहरातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. फुटपाथ अयोग्य आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते करताना मध्यभागी उंची आणि दोन्ही बाजूला निमुळते असे रस्ते केले जातात. जेणे कऊन पावसाचे पाणी रस्त्यात कुठेही साचत नाही. मात्र शहरातील रस्ते करताना पाणी साचून राहू नये, अशी काळजी घेतली जात नाही. निविदेत रस्त्यांचे जे काही आयुष्यमान ठरवले, त्यानुसार रस्ता टिकून राहील, असा रस्ता करण्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदारांचीच आहे. रस्त्यांची दुरवस्था दिसली तर संबंधीत ठेकेदाराला जबाबदार धरावे लागेल."

- चंद्रकांत कांडेकरी,सचिव, सिव्हिल इंजिनिअर अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कोल्हापूर

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=FZtV7rP94ms[/embedyt]

Advertisement
Tags :

.