कोल्हापूर-पुणे वंदे भारतची वेळ जैसे-थे
11 रेल्वेच्या सुटण्याच्या वेळेत बदल
4 रेल्वेच्या येण्याची वेळ बदलली
1 जानेवारीपासून अंमलबजावणी
कोल्हापूर
रेल्वे प्रशासनाने राज्यातील कोल्हापूरसह अन्य स्टेशनवरील बस सुटण्याच्या वेळेत बदल केला आहे. यामध्ये कोल्हापुरातून सुटणाऱ्या 11 आणि कोल्हापुरात येणाऱ्या 4 रेल्वेचा समावेश आहे. परंतू कोल्हापूर-पुणे वंदे भारतच्या वेळेत कोणताही बदल केलेला दिसत नाही.
मध्य रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी काही रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. कोल्हापूर प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार यापैकी सातारा-कोल्हापूर रेल्वेच्या वेळेत बदल झाला आहे. ही रेल्वे आता प्रवाशांच्या मागणीनुसार सकाळी 10 ऐवजी 9.30 वाजता कोल्हापुरात येणार आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय टळणार आहे. या निर्णयासोबतच रेल्वेने कोल्हापुरातून सुटणाऱ्या 11 रेल्वेच्या वेळेमध्येही बदल केला आहे. तसेच कोल्हापुरात येणाऱ्या 3 रेल्वेचा वेळेत बदल केले आहेत. 1 जानेवारीपासून यांची अंमलबजावणी होणार आहे.
कोल्हापुरातून पुण्याला आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत रेल्वे सुरू आहे. कोल्हापुरातील ही पहिली वंदेभारत रेल्वे आहे. आरामदायी आणि कमी वेळेत पुण्यात पोहोचणारी ही रेल्वे आहे. परंतू याची वेळ सकाळी 8.15 वाजता आहे. दुपारी 1 च्या सुमारास ही रेल्वे पुण्यात पोहोचते. दुपारी पुण्यात पोहोचल्यानंतर नोकरदार, व्यावसायिकांना कामासाठी अवधी कमी मिळतो. त्यामुळे या रेल्वेच्या वेळेत बदल होण्याची अपेक्षा होती. परंतू रेल्वे प्रशासनाने या रेल्वेच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे वंदे भारत आणि कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातून एकाचवेळी सकाळी 8.15 मिनटांनी सुटत होत्या. आता कोयाना एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ 8.25 केली आहे. दोन रेल्वेतील सुटण्याचा अवधी केवळ दहा मिनटांचा आहे. त्यामुळे पुण्याला जाणारे बहुतांशी कोयनाला पसंती दर्शवत आहेत. वंदे भारतच्या वेळेत बदल केल्यास प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील बदलेल्या प्रमुख रेल्वेचे वेळापत्रक
रेल्वेचे नाव सध्या सुटण्याची वेळ बदलेली वेळ
कोल्हापूर-पुणे डेमू पहाटे 5 वाजता पहाटे 5.10 मिनटे
कोयना एक्स्प्रेस सकाळी 8.15 सकाळी 8.25
हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस सकाळी 9.10 सकाळी 9.35
कोल्हापूर-मिरज डेमू सकाळी 10.30 सकाळी 10.25
कोल्हापूर-तिरूपती सकाळी 11.40 सकाळी 11.45
कोल्हापूर अहमदाबाद दुपारी 1.15 दुपारी 1.30
महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 2.45 दुपारी 2.50
कलबुर्गी एक्सप्रेस दुपारी 3 दुपारी 3.05
कोल्हापूर-सांगली डेमू सायंकाळी 7.40 सायंकाळी 7.35
महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8.50 रात्री 8.55