MH Rain Update : कोल्हापूर, पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पुढील 2 दिवस पाऊस, IMD चा इशारा
जोरदार वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पाऊस झाला.
Maharashtra Whether Update : आज कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगलीसह घाट परिसरात जोरदार पाऊस पडला. पुण्यातही पावसाने धुवांधार बॅटिंग केली असून काही ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण असलेल्या कोल्हापूरसह परिसरात सायंकाळी पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पाऊस झाला. ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे.
दरम्यान, पुणे हवामान विभागाकडून उद्याही (21 मे) रोजी कोकण, गोवा, कोल्हापूर, सातारा व घाट विभाग, सोलापूर, संभाजी नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 21 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
वरील सर्व जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी असू शकतो. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्रवरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात तापमान अशंत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.