झालं गेलं विसरुन जा...लोकसभेला आशिर्वाद द्या! संजय मंडलिकांचे के. पी. पाटीलांना भावनिक आवाहन
- सरवडे प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु असतानाच विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी आज बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांची कारखान्याच्या प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीवेळी केलेले आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग होता. परंतू आता झालं गेलं विसरुन लोकसभेला आशिर्वाद द्या असे भावनिक आवाहन खा. मंडलिक यांनी केले. यावेळी के. पी. यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयानुसार आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगत मंडलिकांना सहकार्याचे आश्वासन दिले.
बिद्रीच्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागलेल्या विरोधी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करणारे खासदार मंडलिक हे आज पहिल्यांदाच के. पी. पाटील यांची भेट घेण्यासाठी कारखान्यात आले होते. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप यांची सत्ता आहे. त्या आघाडीनुसार खास. मंडलिक लोकसभेसाठी मोर्चबांधणी करत आहेत. त्यानुसार त्यांनी सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान साखर कारखान्यासंबधी केंद्राचे धोरण हिताचे नाही, असे के. पी. पाटील म्हणाले. त्यावर यासंबंधी आपण सातत्याने संंबंधीत मंत्र्यांशी यावर चर्चा केली असल्याचे खा.मंडलिक यांनी सांगितले.
या भेटीवेळी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी खास. मंडलिक यांचा सत्कार केला. दरम्यान आजच बिद्री चे ९ लाख टन गाळप पूर्ण झाले. हा मोठा टप्पा आहे असे सांगत खास. मंडलिक यांनी अध्यक्ष के. पी. यांच्या कामाचे कौतुक केले. तर अध्यक्ष पाटील यांनीही वेळात वेळ काढून बिद्रीचे इथेनॉलसह अन्य प्रकल्प पाहण्यासाठी यावे असे खा. मंडलिकांना निमंत्रण दिले.त्यानंतर खास. मंडलिक व अध्यक्ष के. पी. पाटील यांची बंद खोलीत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली.
आमच्या दाजींकडे जरा लक्ष ठेवा....
या भेटीदरम्यान के. पी. पाटील खास. मंडलिक यांच्याकडे पाहत म्हणाले, तुमचे मित्र आणि आमच्या दाजींच्याकडे जरा लक्ष द्या. आपल्या माध्यमातून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा असे सांगितले. यावर खा. मंडलिकांनी स्मितहास्य करत हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचे स्पष्ट केले.