कोल्हापूरातून भाजप नेत्यांचा मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध...मागल्या वेळी चुक झाल्याची कुपेकरांची कबुली
मंडलिकांचा मतदारसंघात संपर्क नाही...आमची चुक झाली आम्ही त्यांना पाठींबा दिला आणि धनंजय महाडिकांच्या विरोधात प्रचार केला. अशी जोरदार टिका भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी संजय मंडलिकांवर केली आहे.
देशभरात लोकसभेचे बिगूल वाजले असून कोल्हापूरातही राजकारण तापत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांबरोबरच सहकारी पक्षांच्या नेत्यांचीही उणीदूणी निघत आहेत. महायुतीच्या जागावाटपावरून सध्या कोल्हापूरात महायुतीमध्ये काहीस तणावाचं वातावरण दिसत आहे. आता मंडलिकांच्या उमेदवारीला महायुतीमधूनच विरोध होत असून महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी मंडलिकांना जाहीर विरोध केला आहे.
चंदगड तालुक्यातील भाजपचा चेहरा असलेले संग्रामसिंह कुपेकर यांनी गडहिंग्लज मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्य़ा मेळाव्यात कोल्हापूरच्या जागेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्याचा आरोप करताना ते म्हणाले, "सध्याच्या विद्यमान खासदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही. उद्या निकालानंतर जर दगाफटका झाला तर आमच्या डोक्यात खापर फुटणार आहे की भाजपने कोणतीच मदत केली नाही. मागील वेळी आम्ही धनंजय महाडिकांविरोधात प्रचार करून खुप मोठी चुक केली." असा खळबळजनक विधान त्यांनी केलं.
कोल्हापूर लोकसभेमध्ये जागावाटपावरून महायुतीचा सस्पेन्स कायम असताना संग्रामसिंह कुपेकर यांच्या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात ट्विस्ट आला आहे.